महिलांवरील अत्याचाराची संख्या अल्प होत नाही ! – रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग
कोल्हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेले वर्षभर मी महिला आयोगाच्या निमित्ताने सुनावणी घेण्यासाठी राज्यभर फिरत आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर सुनावणीसाठी महिला अल्प संख्येने अल्प असतील असा विचार करते; मात्र त्यांची संख्या वाढलेलीच दिसते. त्यामुळे दुर्दैवाने महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढलेलीच दिसते, तसेच महिलांवरील अत्याचारांविषयी महाराष्ट्रात जागृती नाही, त्यासाठी समाजाची मानसिकता पालटली पाहिजे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. त्या कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (महिलांवरील अत्याचार न्यून होण्यासाठी समाजाची मानसिकता पालटण्यासाठी समाजाने धर्माचरण करणे अत्यावश्यक आहे ! धर्माचरणी समाज असेल, तर समाजात केवळ महिलांवरील अत्याचारच नाही, तर प्रत्येक समस्या आपोआपच अल्प होतील ! – संपादक)
१. स्वच्छतागृहाची सोय नाही, रस्ते नाहीत, विवाहाची नोंद नाही यांसह विविध प्रकारच्या तक्रारी महिलांनी आजच्या सुनावणीच्या कालावधीत केल्या. आजच्या सुनावणीत ९१ तक्रारी प्राप्त झाल्यात त्यात सर्वाधिक तक्रारी या कौटुंबिक छळ, त्रास यांच्या होत्या.
२. राज्यात अद्यापही बालविवाहचे प्रमाण असून ज्या मंदिरात असा विवाह होईल तेथील मंदिराचे पुजारी, विश्वस्त यांच्यावर कारवाई केली जाईल. (एखाद्या मंदिरात विश्वस्तांना माहिती नसतांना बालविवाह झाला, तर त्याला विश्वस्त, पुजारी कसे काय उत्तरदायी ? आणि बालविवाहाच्या घटना केवळ हिंदूंमध्ये घडतात, असे रूपाली चाकणकर यांना म्हणायचे आहे काय ? – संपादक)
३. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक आस्थापनांमध्ये महिलांवर अत्याचार होत असूनही त्याचे निर्गतीकरण करण्यासाठी अद्याप समिती गठीत करण्यात आलेली नाही.
४. राज्य महिला आयोगाची अध्यक्षा झाल्यावर माझ्याकडून महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचे त्यागपत्र घेण्यात आले. मी केवळ १५ मास महिला आयोगाची अध्यक्षा होते. गेली १८ वर्षे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मी काम केले त्या पक्षाने मला डावलल्याचे दु:ख होते. पक्षासाठी आंदोलन करतांना १२ गुन्हे माझ्यावर नोंद असून ते घेऊन मी राज्यभर फिरत होते. त्यामुळे मी अजित पवार यांच्या समवेत गेल्यावर तो सन्मान आणि महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद मला परत मिळाले.
‘लव्ह जिहाद’च्या प्रश्नावर चाकणकर यांचे मौन ! गेले वर्षभर हिंदु जनआक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून जे मोर्चे निघाले त्यातून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे. तरी या संदर्भात महिला आयोगाकडे किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यासाठी शासन काय प्रयत्न करणार ? असा प्रश्न दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने २ वेळा विचारल्यानंतरही रूपाली चाकणकर यांनी त्यावर उत्तर न देता मौन बाळगले. (घटना घडत असूनही केवळ पक्षाची विचारधारा वेगळी आहे; म्हणून सत्य घटनांवर उत्तर न देणे हा पलायवाद आहे ! अशा पलायनवादी अध्यक्षा महिलांच्या समस्या काय सोडवणार ? – संपादक) |
आयोगाच्या सुनावणीत एक महिला पोलीस कर्मचारी सासूला छळत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावर महिला आयोगाने काय कारवाई केली ? असे पत्रकारांनी विचारले असता ‘पोलीस अधीक्षकांनी त्या संदर्भात स्वत: दूरभाष केला’, असे उत्तर चाकणकरांनी दिले. |