रशियाचे खासगी सैन्य वॅगनर ग्रुप आणि त्याचे प्रमुख प्रिगोझिन गायब !

मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे आणि रशियातील खासगी सैन्य असणार्‍या वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवेनगी प्रिगोझिन हे सैन्यासह गायब झाले आहेत. त्यांची कोणतीही माहिती मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. तज्ञांच्या मते प्रिगोझिन आणि त्यांचे सैन्य अशा प्रकारे गायब होणे, ही पुतिन यांच्यासाठी सतर्क रहाण्याची चेतावणी आहे.

१. रशियाचा शेजारील देश बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेक्झेंडर लुकाशेंके यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, प्रिगोझिन आणि त्यांचे खासगी सैन्य बेलारूसमध्ये नाहीत. ते सेंट पीटर्सबर्गमध्ये असू शकतात किंवा मॉस्कोकडे जात असतील; मात्र बेलारूसमध्ये ते नाहीत.

२. विशेष म्हणजे प्रिगोझिन यांनी पुतिन यांच्या विरोधात बंड केल्यानंतर लुकाशेंके यांनीच मध्यस्थी करून हे बंड मागे घेण्यास लावले होते. त्या वेळी ‘प्रिगोझिन आणि त्यांचे सैन्य रशियातून बेलारूसमध्ये जाणार’, असे ठरवले होते आणि ते तेथून निघालेही होते; मात्र आता लुकाशेंके यांच्या म्हणण्यानुसार प्रिगोझिन आणि त्यांचे सैन्य बेलारूसमध्ये पोचलेच नाही. यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.