सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात पाऊस पडत असला, तरी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार गेल्या २ वर्षांपेक्षा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अल्प पाऊस पडला आहे. छोट्या पडझडीच्या घटना वगळता मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही.
वीजवाहिनीचा धक्का बसून मळगाव येथे बैलाचा मृत्यू
सावंतवाडी तालुक्यात कुंभारवाडी, मळगाव येथे चरायला सोडलेल्या बैलाला तुटून पडलेल्या विद्युत् भारीत वीजवाहिनीचा धक्का बसून मृत्यू झाला. बैल तडफडत असलेला पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेले शेतकरी न्हानू दशरथ खडपकर हे तुटलेली विद्युत् वाहिनी पाहून लांब गेल्याने अनर्थ टळला. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा प्रसंग ओढवला असून हानीभरपाई मिळावी, अशी मागणी खडपकर यांनी केली आहे.
झाडाखाली अडकलेल्या महिलेला वाचवण्यात यश
५ जुलै या दिवशी मालवण तालुक्यातील पीरवाडी, आचरा भागातील पूरग्रस्त रस्त्यांची पहाणी करत असतांना भंडारवाडी, आचरा येथील मुख्य रस्त्यावर असणार्या मारुति मंदिराच्या समोरील मोठे झाड पडून रस्ता बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस घटनास्थळी गेल्यावर तेथे एका महिलेचा वेदनादायक आवाज ऐकू आल्याने पोलिसांनी पाहिले असता झाडाच्या बुंध्याखाली अडकलेली एक महिला दिसली. त्यामुळे तातडीने झाड तोडून त्या महिलेला बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्यामुळे तिचे प्राण वाचले.
(सौजन्य : Kokansad Live)
पावसामुळे झालेली हानी
जिल्ह्यात ६ जुलै या दिवशी १० घरांची हानी झाली असून आतापर्यंत एकूण ४३ घरांची अंशत: हानी झाली आहे. यासह २ झोपड्या आणि ६ गोठ्यांची हानी झाली आहे.
नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेची चेतावणी
वैभववाडी तालुक्यातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प (धरण) भरत आले असून कुठल्याही क्षणी धरणातील अतिरिक्त पाणी अरुणा नदीत सोडण्यात येणार आहे. पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी ग्रामस्थ अन् शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
माडखोल आणि हरकुळ येथील लघु पाटबंधारे (धरण) प्रकल्प अन् देवगड तालुक्यातील कोर्ले-सातंडी येथील मध्यम पाटबंधारे (धरण) प्रकल्प यांतून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८४९.६ मि.मी. पाऊस पडला असून ६ जुलै या दिवशी वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १३५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातार्डा येथे झाड पडून साकव तुटला (साकव म्हणजे छोटा पूल)
सावंतवाडी – तालुक्यातील भटपावणी, सातार्डा येथे झाड पडल्याने लोखंडी साकव तुटला. यामुळे येथील ग्रामस्थांचा सातार्डा बाजारपेठेशी असलेला संपर्क सुटला आहे. या दुर्घटनेत विलास गोवेकर हे थोडक्यात वाचले. येथील ग्रामस्थांची पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.