परशुराम घाटात करण्यात येत आहे महामार्गावर पडलेल्या भेगांची दुरुस्ती
चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भरावावर केलेल्या काँक्रिटिकरणाला भेगा पडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची दखल घेत ठेकेदार ‘कल्याण टोलवेज आस्थापना’ला डागडुजी करण्याचे आदेश दिले आहेत. आता ही दुरुस्ती तात्पुरती करण्यात येत असून या घाटात प्रवाशांना वाहतुकीसाठी कोणताही अडथळा, तसेच धोका नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सांगितले आहे.
मागील मासातच या घाटातील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्वरित या मार्गिकेवरून वाहतूक चालू करण्यात आली होती; मात्र पावसाला प्रारंभ होताच दरडीच्या बाजूने असलेल्या काँक्रिटिकरणाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याविषयी मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालयावर धडक दिली होती. महामार्गावर तडे गेले, तसेच तडे संरक्षक भिंतीलाही गेल्याची माहिती मनसेच्या पदाधिकार्यांनी राष्ट्रीय महामार्गच्या अधिकार्यांना निदर्शनास आणून दिली होती.
‘या महामार्गावर पडलेल्या भेगा सिमेंटने भरण्यात येत आहेत. या मार्गावर काँक्रिटिकरणास आवश्यक असलेला १४ दिवसांचा कालावधी मिळाला नसतांना या मार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली होती. जिथे रस्ता खराब होईल, तिथे दुसरी मार्गिका पूर्ण झाल्यावर दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर दरडीच्या बाजूची मार्गिका पूर्ण झाल्यावर त्या मार्गावर वाहतूक वळवून भेगा पडलेल्या या मार्गिकेचे काँक्रिटीकरण नव्याने करण्यात येईल’, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.