श्रीक्षेत्र कांदळी येथे भक्तीमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !
नारायणगाव (पुणे) – श्रीक्षेत्र कांदळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्री रामचंद्र देव एवं प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’च्या वतीने २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या २ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
२ जुलै या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळात प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीची नित्य पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत कु. देविका दिनेश पाटील आणि कु. मंजिरी दिनेश पाटील यांनी भरतनाट्यम् नृत्य सादर केले.
रात्री ९ ते ११ या वेळेत बाल कीर्तनकार ह.भ.प. प्रणव रवींद्र जोशी (जालना) यांनी ‘श्री गुरु-शिष्य नाते’ या विषयावर कीर्तन सादर केले. यामध्ये राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज, संत विसोबा खेचर अन् संत नामदेव महाराज यांचे गुरु-शिष्य नाते कसे होते, त्याचे महत्त्व विशद केले. या वेळी श्री. वेदांत कुलकर्णी यांनी तबल्याची आणि श्री. सखाराम मुळे यांनी हार्मोनियम (पेटी)ची साथ दिली. या व्यतिरिक्त रात्री प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी केले.
३ जुलै या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत प.पू. बाबांच्या समाधीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली. या वेळी सत्यनारायण पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी प.पू. बाबांचे ज्येष्ठ पुत्र पू. नंदूदादा कसरेकर हेही उपस्थित होते.