मडगाव (गोवा) नगरपालिका इमारतीत पाण्याची गळती झाल्याने महत्त्वाची कागदपत्रे खराब होण्याची भीती

मडगाव, ५ जुलै (वार्ता.) – मडगाव नगरपालिका इमारतीत पावसाचे पाणी गळत असल्याने कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगरपालिका कार्यालयातील कर आकारणी आणि व्यवस्थापन विभाग येथे पावसाचे पाणी गळत आहे. या विभागांमध्ये मडगाव येथे जन्मलेल्यांची जन्म-मृत्यू नोंदणीसंबंधी महत्त्वाची कागदपत्रे आहेत. कार्यालयीन वेळेत कर्मचारी गळणारे पाणी बालद्यांमध्ये साठवून ठेवत आहेत. कार्यालयीन वेळेनंतर गळणार्‍या पाण्यामुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून नष्ट होण्याची भीती पालिकेतील विरोधी गटाकडून व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

संपादकीय भूमिका

राज्यात सर्वत्र विकासाद्वारे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असतांना पालिकेतील कागदपत्रे इमारतीतील गळतीमुळे नष्ट होण्याची वेळ कशी काय येते ? या समस्येवर अत्याधुनिक उपाययोजना नाही कि उपाययोजना काढायची इच्छाशक्ती नाही ?