गोव्यात अतीवृष्टीमुळे आज शैक्षणिक सुट्टी
सलग आठव्या दिवशी मुसळधार पाऊस
पणजी, ५ जुलै (वार्ता.) – गुजरात ते केरळच्या किनार्यापर्यंत समुद्रसपाटीजवळ निर्माण झालेला अल्प दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळसदृश स्थिती यांमुळे गोव्यासह पश्चिम किनारपट्टीला पावसाने झोडपले आहे. राज्यात गेल्या २४ घंट्यांमध्ये १०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. राज्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पाणी साचणे, रस्त्याच्या बाजूची माती खचणे, पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात जाणे, झाडांची पडझड होणे, घरांच्या भिंती पडणे आदी घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यात सलग आठव्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Goa Monsoon 2023: गोव्यात उद्या शाळांना सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सरकारचा निर्णयhttps://t.co/yUgvBYc6xX
#goamonsoon2023 #goamonsoon #goa #goanews #goaupdate #goarain
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) July 5, 2023
हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने शिक्षण खात्याने पहिली ते बारावी इयत्तेतील मुलांना ६ जुलै या दिवशी सुट्टी घोषित केली आहे. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी ५ जुलै या दिवशी सायंकाळी उशिरा ही माहिती दिली. ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा चालू आहेत, तेवढेच वर्ग ६ जुलै या दिवशी चालू रहाणार असल्याचे सांगण्यात आले. हवामान विभागाने राज्यात ९ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
कांपाल-मिरामार रस्त्याला सर्वाधिक फटका
पणजी शहरात मुख्य रस्त्यासह लगतचा मळा, पाटो, सांतिनेज, ताळगाव, करंजाळे परिसर, दिवजा सर्कल ते मिरामार रस्ता यांवर पाणी साचले आहे.
टोक आणि कांपाल येथील सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. नेरूल येथे फ्रान्सिस्को मेंडिस यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनावर नारळाचे झाड (माड) पडल्याने वाहनाची पूर्णपणे हानी झाली आहे. झरीर, गोवा वेल्हा आणि खोर्ली, म्हापसा येथील घरांवर झाडे पडल्याचे वृत्त आहे.
नाकेरी, बेतुल येथे शेतात काम करणारी महिला पाण्यात वाहून गेल्याची भीती
मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आल्याने नाकेरी, बेतुल येथे शेतात काम करणारी एक महिला पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Betul Woman Drowned: नाकेरी बेतुल येथे साळ नदीत बुडाली महिला https://t.co/pduHaVJNFk
#salriver #womandrowned #betul #goa #goamonsoon #goarain— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) July 5, 2023
संबंधित महिलेला शोधण्याचे कार्य चालू आहे.
पणजी-वास्को मार्गावरील कदंब बसला अपघात
Kadamba Bus Accident: कदंबा बसला अपघात; ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, भरधाव बस चढली रेलिंगवर https://t.co/zwLlFkDaDd
#kadamba #kadambabusaccident #goa #goanews #goaupdate #goarain #kadambatransport— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) July 5, 2023
पणजी-वास्को मार्गावरील कदंब बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस बांबोळी येथे रस्त्याजवळच्या कठड्यावर चढली; मात्र सुदैवाने या अपघातात कुणीही घायाळ झाले नाही.
गोव्यात ४ जुलै या दिवशी विक्रमी पावसाची नोंद
गोव्यात ४ जुलै या दिवशी पुन्हा विक्रमी पावसाची नोंद झाली आणि पावसाची प्रतिदिन सरासरी तूट घटून ती ३.९ टक्क्यांवर पोचली आहे. गोव्यात ४ जुलै या दिवशी (सकाळी ८.३० ते दुसर्या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत) १०५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली.
काणकोण येथे सर्वाधिक पावसाची नोंद
गेल्या २४ घंट्यांमध्ये काणकोणमध्ये १७०.२ मि.मी. असा सर्वाधिक पाऊस नोंद झाला आहे. केपे येथे १४०.६ मि.मी., सांगे येथे १०४.५ मि.मी., मुरगाव येथे १०४.६ मि.मी., मडगाव येथे १२२.६ मि.मी., दाबोळी येथे १०४.६ मि.मी., तर पणजी येथे ११९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
Goa Monsoon 2023: राज्यात सर्वत्र मुसळधार; 24 तासांत 100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस, काणकोणमध्ये सर्वाधिक https://t.co/iIAGOGG16H
#goamonsoon2023 #goamonsoon #imdgoa #imd #goarain #goamonsoonupdate #redalert #panaji— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) July 5, 2023
पाऊस मोजण्याच्या ८ केंद्रांमध्ये १ सहस्र मि.मी.हून अधिक, तर उर्वरित ५ केंद्रांत पावसाची नोंद १ सहस्र मि.मी.च्या जवळ पोचली आहे. सध्या मडगाव नोंदणी केंद्रात सर्वाधिक म्हणजे १ सहस्र २९७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बाणावली येथे पूरसदृश स्थिती : नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
मडगाव – बाणावली येथील सखल भागात पाणी साचले असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा कहर असाच चालू राहिल्यास सखल भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याची शक्यता भासू शकते.
काणकोण येथे पूरसदृश स्थिती
काणकोण तालुक्यातील आगोंद नदी, तसेच देवबाग आणि दुमाणे येथील नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. येथील शेती पाण्याखाली गेली आहे, तर लोकवस्तीच्या ठिकाणी पाणी साचून रहात आहे.