कृतज्ञता व्यक्त करणे, हे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी ! – अमेरिकेच्या मोन्टाना विद्यापिठातील संशोधक स्टीफन एम्. योशिमुरा
‘हिंदु धर्मात कृतज्ञताभावाला महत्त्व दिले आहे. हिंदू तिकडे दुर्लक्ष करतात. आता पाश्चात्त्य संशोधकांनी त्याचे महत्त्व सांगितल्यामुळे काहीजण असे प्रयत्न करू लागले, तर हा लेख प्रकाशित केल्याचे सार्थक होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
१. कृतज्ञता व्यक्त करणे, हा स्थायीभाव असणे
‘एखादे काम झाल्यानंतर त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हा माणसाचा स्थायीभाव आहे. ज्या वेळी आपण कुणाकडून भेटवस्तू घेतो, त्या वेळी भेटवस्तू दिल्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. त्यामुळे कळत-नकळत अनेक लाभ दिसून येतात.
२. कृतज्ञता व्यक्त करण्यामुळे होणारे लाभ
अमेरिकेच्या मोन्टाना विद्यापिठातील संशोधकांनी ‘कृतज्ञता व्यक्त केल्यावर त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर निश्चित कोणते परिणाम होतात ?’, याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना ‘व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सातत्याने अधिकाधिक सकारात्मक परिणाम होत जातो’, असे लक्षात आले.
२ अ. शारीरिक लाभ
१. ‘इतरांना साहाय्य करण्याची सवय लागते.
२. आशावाद असण्याची आणि व्यायाम करण्याची सवय लागून शारीरिक आरोग्य उत्तम रहाण्यास साहाय्य होते.
३. जे लोक इतरांच्या तुलनेत जास्त कृतज्ञता व्यक्त करतात; ते अल्प आजारी पडतात, अधिक चांगला व्यायाम करतात आणि चांगल्या गुणवत्तेची झोप घेतात.
२ आ. मानसिक लाभ
१. मानसिक तणाव, चिंता, मत्सर, चाकरीशी (नोकरीशी) संबंधित ताण आणि अचानक राग येण्याची पातळी न्यून होण्यास साहाय्य होते.
२. दीर्घकालीन चांगले संबंध ठेवायचे असतील, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा मोठा लाभ होतो.
३. कृतज्ञता व्यक्त करून प्रतिसाद दिल्यामुळे औदार्य वाढीस लागण्यास साहाय्य होते.
४. ‘ज्या वेळी आपण सार्वजनिकरित्या कृतज्ञता व्यक्त करतो, त्या वेळी आपला निःस्वार्थी स्वभाव दिसून येतो. प्रत्येकाने याचा अनुभव घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपले आयुष्य समाधानी होण्यास साहाय्य होते’, असे अमेरिकेच्या मोन्टाना विद्यापिठातील स्टीफन यांनी म्हटले आहे.
३. कृतज्ञता व्यक्त केल्याने होणार्या लाभांविषयी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता !
‘कृतज्ञतेमुळे होणार्या लाभांविषयी संशोधन करून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे’, असे स्टीफन यांनी म्हटले. हे संशोधन ‘रिव्ह्यू ऑफ कम्युनिकेशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध केले आहे.’
(‘दैनिक लोकसत्ता (आरोग्य वार्ता, पी.टी. आय., वॉशिंग्टन)’, १७.४.२०१७)