उच्च आध्यात्मिक स्थिती असूनही आपलेपणाने बोलून सर्वांना आश्वस्त करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
संत किंवा अध्यात्मातील अधिकारी विभूती यांची आध्यात्मिक स्थिती निराळी असते. अशा वेळी त्यांच्याशी ‘संवाद कसा साधावा’, या विचाराने एक वेगळ्या प्रकारचे दडपण येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहजावस्थेमुळे त्यांच्या आध्यात्मिक स्थितीचे कोणतेही दडपण न येता त्यांच्याशी सहजतेने संवाद साधता येतो. त्यांच्या एका एका शब्दातही एवढा आपलेपणा असतो की, साधकाला बाह्य जगाचा विसरच पडतो. अवतारस्वरूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव त्यांच्या आध्यात्मिक कार्यासाठी अधिकाधिक काळ निर्गुणावस्थेत अथवा ध्यानावस्थेतच असतात. अनेकदा त्यांची शिवदशा असते. असे असूनही साधकांशी संवाद साधकांना ते त्या त्या साधकाच्या स्थितीला जाऊन बोलतात. केवळ साधकांसाठी ते सगुणावस्थेत येतात.
साधक भेटल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या मुखावर दिसणारा आनंद अनमोल असतो. साधकाच्या मुखावर भगवंतभेटीचा आनंद झळकत असतो, तर भगवंताच्या मुखावर साधकाच्या भेटीचा आनंद झळकत असतो. सनातनच्या सहस्रो साधकांनी श्रीगुरूंना साधकांविषयी वाटणारा हा आपलेपणा अनुभवलेला आहे. येथे त्याविषयीचे काही प्रातिनिधिक प्रसंग दिले आहेत.
१. प.पू. डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटलेले नसतांनाही त्यांच्या आपुलकीच्या बोलण्याने ते प्रतिदिन भेटत असल्यासारखे वाटणे
‘पूर्वी मी प.पू. डॉक्टरांना प्रत्यक्षात कधीही भेटले नव्हते. २७.२.२०१२ या दिवशी मला त्यांच्या खोलीतील स्वच्छता आणि पूजा सेवा करण्याचे भाग्य लाभले. त्यासाठी पहिल्या दिवशी खोलीत गेल्या गेल्या त्यांनी मला विचारले, ‘‘तुझे बाबा कुठे आहेत ? त्यांनी तुझ्यासंदर्भात चांगले लिहून दिले आहे. त्यातून सगळ्यांना शिकायला मिळाले ना ?’’ त्या वेळी त्यांचे बोलणे असे होते की, जणू काही मी त्यांना प्रतिदिनच भेटत होते. त्यांच्याशी बोलल्यावर मला ‘मी प्रतिदिन त्यांना (भगवंताला) भेटते’, असे वाटू लागले आणि फार कृतज्ञता वाटली.
२. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील सेवा प्रथमच करत असतांना प.पू. डॉक्टरांनी ‘मी आहे ना !’ असे म्हणून आश्वस्त करणे
त्या दिवशी कल्याणीताई मला सेवा शिकवत होती. तिने मला आदल्या दिवशी खोलीत काय काय सेवा करायच्या, ते शिकवले. दुसर्या दिवशी खोलीत गेल्यावर ‘माझ्याकडून प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील साहित्य जागेवर लावले जाईल का ? मला देवघरातील देव जसे आहेत, तसे ठेवता येतील का ?’, या विचारांनी फार भीती वाटत होती. तेवढ्यात कल्याणीताई आली आणि म्हणाली, ‘‘थोडा वेळ मी तिच्यासोबत थांबू का ?’’ तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘मी आहे ना !’’ नंतर ती गेल्यावरही ते मला पुन्हा म्हणाले, ‘‘मी आहे ना !’’
३. खोलीतील प्रत्येक सेवा कशी करायची, हे प.पू. डॉक्टरांनी अत्यंत प्रेमाने शिकवल्यामुळे साधिकेचा कृतज्ञताभाव वाढणे
केर काढायला कुठून चालू करायचे ? पंख्याची कळ कुठे आहे ? पंचा कुठे वाळत घालायचा ? सदरा कुठे ठेवायचा ? पंच्याची घडी कशी घालायची ? ताट कसे वाढायचे ? हे सगळे प.पू. डॉक्टरच मला सांगत होते. कचरा काढतांना ते स्वतःच आसंद्या सरकवून ठेवत. ‘‘तुळस जागेवर ठेवलीस का ? खोलीतील दुपारची भांडी घेतलीस का ?’’, असे विचारून ते माझ्याकडून परिपूर्ण सेवा करवून घेत होते. सेवा झाल्यावर ‘‘झाले आता’’, असे ते प्रेमाने म्हणाले.’
– कु. दीपाली मतकर (आताच्या सनातनच्या धर्मप्रचारक पू. दीपाली मतकर), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (फेब्रुवारी २०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |