वन्दे मातरम्’चा महिमा !
भारतीय फुटबॉल संघाने चमकदार कामगिरी करत ‘सॅफ’ चषकावर स्वतःचे नावे कोरले. अंतिम सामन्यात कुवेतवर मात करत भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळाल्यानंतर काही क्षणांतच स्टेडियममधील प्रेक्षकांनी ए.आर्. रेहमान यांनी गायलेले ‘वन्दे मातरम्’ हे गीत गायले. या रोमांचक क्षणाचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. बेंगळुरूच्या श्री कांतीरावा स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. या ठिकाणी तब्बल २६ सहस्र प्रेक्षक उपस्थित होते. या सर्वांना एकत्रितपणे, जोशपूर्ण, एका सुरात आणि लयीत ‘वन्दे मातरम्’ म्हणतांना पाहून कुठल्याही भारतियाचा ऊर अभिमानाने भरून येईल. हा सामना अटीतटीचा झाला. आरंभी भारत पिछाडीवर होता. नंतर भारताने बरोबरी साधली. शेवटी ‘पेनल्टी शूटआऊट’मध्ये भारताने कुवेतवर ५-४ अशी मात केली आणि ‘सॅफ’ या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. भारताचे हे या स्पर्धेचे नववे जेतेपद ठरले हे विशेष ! हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्रिकेटप्रेमींना वर्ष २०११ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्याची आठवण झाली. तेव्हाही सहस्रो क्रिकेटप्रेमींनी रात्रीच्या वेळी भ्रमणभाषची विजेरी चालू करून स्टेडियममध्ये ‘वन्दे मातरम्’ हे गीत गायले होते. एका महत्त्वाच्या सामन्यात स्वतःच्या संघाने सामना जिंकल्यावर प्रेक्षक त्यांच्या परीने आनंद व्यक्त करत असतात. श्री कांतीरावा स्टेडियममध्ये जमलेल्या फुटबॉलप्रेमींना स्वतःचा आनंद व्यक्त करण्यासाठी ‘वन्दे मातरम्’ म्हणावेसे वाटले, हे विशेष आहे.
आजही देशप्रेम, देशाभिमान किंवा देश जिंकल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी बहुतांश भारतियांना ‘वन्दे मातरम्’ म्हणूनच तो व्यक्त करावासा वाटतो, हे लक्षात घ्या ! हे २ शब्द देशप्रेमींना संघटित करतात, त्यांच्यात नवचैतन्य जागृत करतात आणि देशासाठी काही तरी करण्याचे एक बळ निर्माण करतात. स्वातंत्र्यानंतर निधर्मीवादाच्या नावाखाली काँग्रेसच्या शासनकर्त्यांनी भारतियांच्या मनात अढळ स्थान असलेले ‘वन्दे मातरम्’ हे २ शब्द पुसून टाकण्याचा अतोनात प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. आजही भारतातील युवकांना हे २ शब्द भुरळ घालतात. त्यामुळे स्टेडियममध्ये युवा फुटबॉलपटूंनी ‘वन्दे मातरम्’ म्हणणे, ही एकप्रकारे ‘वन्दे मातरम्’चे अस्तित्व मिटवू पहाणार्यांना चपराक होय !
‘वन्दे मातरम्’ गीताचा महिमा !
भारतीय फुटबॉल संघाने केलेली उत्कृष्ट कामगिरी ही अंगावर शहारे आणणारी आहे. इतर खेळांच्या वेळी खेळाडूंना पाण्याची बाटली फेकून मारणे, कागद भिरकावणे, खाद्यपदार्थ पटांगणात टाकणे, मैदानात येणे, अंगविक्षेप करत नाचगाणे करणे अशा कित्येक विकृत गोष्टी तरुण करत असल्याचे पाहिले आहे; मात्र बेंगळुरूच्या श्री कांतीरावा स्टेडियममधील चित्र वेगळे होते. या तरुण फुटबॉलप्रेमींनी कोणतेही विकृत चाळे न करता ‘वन्दे मातरम्’ गीत गाऊन देशाप्रती प्रेम व्यक्त केल्याचे पहायला मिळाले. हीच देशभक्ती आहे. ज्या मातीत, देशात आणि कर्मभूमीत आपला जन्म झाला आहे, त्या मातीशी एकनिष्ठ राहून देशाप्रती लढत रहाण्याची शक्ती ‘वन्दे मातरम्’ या गीतातून मिळते.
४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी चौरीचौरा शताब्दी महोत्सवात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तरप्रदेशातील नागरिकांनी सलामीच्या मुद्रेत ‘वन्दे मातरम्’ गातांनाचे व्हिडिओ दीड लाखांहून अधिक लोकांनी अपलोड केला. ‘वन्दे मातरम्’विषयी असलेली जनभावना यातून दिसून येते.
देशभावना जागृतीसाठी ‘वन्दे मातरम्’ आवश्यक !
‘वन्दे मातरम्’ हे गीत केवळ हिंदूंसाठी आहे, या गीतात हिंदूंच्या देवतांची स्तुती करण्यात आली आहे, त्याचा आपल्या इस्लाम पंथाशी काही संंबंध नाही’, असा कांगावा करून काही धर्मांध मुसलमान हे गीत म्हणण्यास नकार देतात. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षवालेही या गीताला विरोध करतात. ‘वन्दे मातरम्’मध्ये असणारी शक्ती प्रत्येक भारतीय वारंवार अनुभवत असतो. या कारणास्तव सर्व स्पर्धा, कार्यक्रम, महोत्सव, अधिवेशन या ठिकाणी ‘वन्दे मातरम्’ म्हणायला हवे, जेणेकरून प्रत्येक तरुणामध्ये देशाभिमान, देशप्रेम, कृतज्ञता आदी सद़्गुण अंतर्भूत होतील आणि ‘प्रतिदिन देश, राष्ट्र आणि धर्म यांसाठी आपण काहीतरी करायला हवे’, याची जाणीव प्रत्येक भारतियामध्ये जागृत होईल. वर्ष १९०५ मध्ये हिरालाल जैन यांनी भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला आणि त्याचा शेवट ‘वन्दे मातरम्’ या गीताने केला होता. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटगृहात चित्रपट संपल्यानंतर राष्ट्रगीत म्हटले जाते. या वेळी सर्वजण उभे राहून हे गीत म्हणतात. हा चांगला भाग आहे. यातून थोडा वेळ का असेना, देशप्रेम निर्माण होऊन देशाप्रती काहीतरी करण्याची अभिलाषा निर्माण होते.
भारताचा स्वातंत्र्यलढा वर्ष १८५७ च्या सशस्त्र क्रांतीपासून चालू झाला. ही क्रांती यशस्वी झाली नसती, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब ही सशस्त्र क्रांतीची केंद्रे बनली; परंतु ही क्रांती वैयक्तिक पातळीवर किंवा छोट्या समुहापर्यंत मर्यादित होती. वर्ष १८७० च्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी सिद्ध झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या म्हणजे वर्ष १८८५ पूर्वीचा तो काळ होता. इंग्रजांचे कुटील कारस्थान आणि जुलमी राजवटीमुळे भारतियांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात ‘वन्दे मातरम्’ या गीताचा जन्म झाला. स्वातंत्र्य आंदोलनात ‘वन्दे मातरम्’ ही अतिशय लोकप्रिय घोषणा होती. कोणत्याही मोर्च्यात ‘भारतमाता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ हे असायचेच. सद्य:स्थितीचा विचार केला, तर देशात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जशी स्थिती होती, तशी निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रघातक्यांच्या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अन् भारतियांमध्ये देशभावना जागृत होण्यासाठी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्हणायलाच हवे.