उलट तपासणीत अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास पंच सुभाष वाणी असमर्थ !
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या ज्या ठिकाणी झाली, त्या घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच सुभाष वाणी यांनाच तेथे असलेल्या अनेक लोकांमधून पोलिसांनी कसे आणि का बोलावले ? ४ सहस्र ८०० फुटांच्या परिसरात काय काय घटना घडल्या , हे पोलिसांसह त्यांनी कसे पडताळले ? आणि ते पंचनाम्यात नमूद केले का ? घटनास्थळाची छायाचित्रे काढली, त्याचा उल्लेख पंचनाम्यात का नाही ? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच सुभाष वाणी यांना उलट तपासणीत देता आली नाहीत. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू असून ३ आणि ४ जुलै या दिवशी संशयितांच्या वतीने ६ अधिवक्त्यांनी पंच वाणी यांची उलटतपासणी केली. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता हर्षद निंबाळकर आणि अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.
ही उलट तपासणी इचलकरंजी येथील ज्येष्ठ अधिवक्ता अनिल रुईकर, अधिवक्ता डी.एम्. लटके, अधिवक्ता ए.जी. बडवे, सांगली येथील अधिवक्ता समीर पटवर्धन, मुंबई येतील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि बेळगाव येथील अधिवक्ता प्रवीण करोशी यांनी केली. या प्रसंगी अधिवक्ता सारंग जोशी, अधिवक्ता समीर मुद़्गल, अधिवक्त्या स्नेहा इंगळे, अधिवक्त्या अनुप्रिता कोळी आणि अधिवक्त्या प्रीती पाटील उपस्थित होत्या. या खटल्यात एकूण १२ संशयित आरोपी असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे.
या प्रसंगी अधिवक्ता अनिल रुईकर म्हणाले, ‘‘पंचनामा करण्यापूर्वी पंच वाणी यांनी ‘लॅपटॉप’मध्ये अगोदरच काही मजकूर टंकलेखन केलेला आहे का ? याची कोणतीही निश्चिती केलेली नाही. रक्तमिश्रीत माती किती ग्रॅम होती, याची नोंद पंचनाम्यात नाही. जेव्हा पंचनामा करण्यात आला, तेव्हा जप्त केलेल्या वस्तू खाकी पाकिटात ‘सील’ केल्या, असे पंच म्हणाले. प्रत्यक्षात त्या वस्तू खाकी पाकिटात नाहीत.’’ पंच वाणी यांची उलटतपासणी घेतांना पुंगळ्यांच्या संदर्भातील जो पंचनामा करण्यात आला, त्या पाकिटावर ‘रिकामी पुंगळी’ असे लिहिलेले नाही, हे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.