गुरूंचे कार्य
गुशब्दस्त्वन्धकारः स्यात् रुशब्दस्तन्निरोधकः ।
अन्धकारनिरोधित्वात् गुरुरित्यभिधीयते ॥
अर्थ : ‘गु’ या शब्दाचा अर्थ अंधकार, अज्ञान किंवा माया असा असून ‘रु’ या शब्दाचा अर्थ प्रकाश किंवा ज्ञान असा होतो. जे शिष्याच्या जीवनातील ‘माया’रूपी अंधकार नष्ट करून ‘ज्ञान’रूपी प्रकाश पसरवतात, तेच गुरु आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिष्यांना केलेले मार्गदर्शन !
१. गुरूंनी सांगितलेले सर्वकाही आपल्याला करता आले पाहिजे !
‘स्वतःच्या मतावर ठाम असणे, हे जिज्ञासेचा अभाव आणि अहं असल्याचे लक्षण आहे. ‘माझ्यासाठी काय चांगले आहे ?’, हे मी ठरवीन’, अशी वृत्ती चुकीची आहे. त्याऐवजी ‘मी/आम्ही माझ्या/आमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी काय करू ?’, ते कृपया सांगा’, असे विचारले पाहिजे. वैद्य/आधुनिक वैद्य यांनी दिलेली औषधे कोणताही प्रश्न न विचारता आपण घेतो, तसेच आपल्या गुरूंनी सांगितलेले सर्वकाही आपल्याला करता आले पाहिजे.’
२. ‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’सारख्या अनेक उच्च स्तरांवरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ती म्हणजे ‘खर्या गुरूंचा ‘खरा शिष्य’ !
३. एक अंतरंग आणि दुसरा बहिरंग शिष्य असतो. प्रत्येक कृती करतांना अंतरंग शिष्याला गुरु किंवा ईश्वर सतत त्याच्याजवळ असल्याची जाणीव असते; म्हणून त्याची कृती योग्य प्रकारे होते. बहिरंग शिष्य गुरु समोर असतील, तरच व्यवस्थित कृती करतो, अन्यथा नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘शिष्य’ म्हणजे काय ?
कुलार्णवतंत्रात शिष्याची व्याख्या करतांना म्हटले आहे,
शरीरमर्थप्राणांश्च सद़्गुरुभ्यो निवेद्य यः ।
गुरुभ्यः शिक्षते योगं शिष्य इत्यभिधीयते ॥
अर्थ : जो तन, धन आणि प्राण (म्हणजे सर्वस्व) गुरूंना समर्पण करून त्यांच्याकडून योग शिकतो (म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना करतो), त्याला ‘शिष्य’ म्हटले जाते.
समर्पित शिष्याचे जीवन !
‘आपल्यावर श्रीगुरूंची दृष्टी पडली की, आता काही करायचे रहात नाही. आदेश येईल, तसे वागत रहायचे. हृदयस्थ नारायणाची प्रेरणा, तोच आदेश, तोच सद़्विवेक ! त्याला अंतर्ज्ञान म्हणा वा सूक्ष्मदृष्टी म्हणा. तिच संवित्ती.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामी, (घनगर्जित, ऑगस्ट, २००७)
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘शिष्य म्हणजे मायेतील विषयांच्या ठिकाणी जो रमत नाही, ज्याचे अवगुण हळूहळू गेलेले आहेत आणि ज्याला सद़्गुरु भेटलेले आहेत तो ! शिष्य त्यांच्या उपदेशाप्रमाणे यथामती चालण्याचा प्रयत्न करतोे. संसारापासून सुटलेला आहे; पण पैलतीर अजून पाहिलेला नाही, त्याचे नाव शिष्य. आपल्याला जे मिळवायचे आहे, त्या आत्मरूपदर्शनासाठी शिष्य जाणीवपूर्वक प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तो कुणाचेही मन दुखवत नाही. कुणाला त्रास होईल, असे वागत नाही. त्याचे वागणे-बोलणे सौम्य अन् हळूवार असते. त्याची रहाणी स्वच्छ, निरामय असते.’
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. (वर्ष १९९१)