कृतज्ञतासुमने !
गुरुचरणी कृतज्ञता ! ही जाणीवच पुष्कळ वेगळी आहे. कृतज्ञतेतच अवघ्या विश्वाचे सार सामावलेले आहे. मनुष्याच्या जीवनाचा उद्धारही यातच आहे. मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती म्हणजे कृतज्ञता होय ! ‘आपण गुरूंचे दास आहोत’, या आर्त जाणिवेने त्यांना साद घालणे अन् ती साद अंतर्मनातून अनुभवणे याहून आनंदस्वरूप दुसरे काही असूच शकत नाही. कृतज्ञता म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातील भावबंधांना जोडणारा अतूट धागा आहे. ‘मी आणि गुरु’ हा अंतरीचा भावच साधनामार्गावरील पुढील वाटचालीसाठी बळ पुरवतो, चैतन्यही देतो. मनात निराशा झाकोळली गेली, आपल्या प्रयत्नरूपी पावलांची गती मंद होऊ लागली, पराभूत होत असल्याची अनामिक भीती मनात निर्माण झाली की, ही कृतज्ञताच आपल्याला भावऊर्जा पुरवून आत्मानंदाची प्राप्ती करवून देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणते.
कृतज्ञतेसाठी कृतज्ञता व्यक्त करायला शब्दसुमनेही अपुरी पडतात गुरुराया ! सुदाम्याच्या आेंजळीत श्रीकृष्णासाठी पोहे होते, त्याने ते श्रीकृष्णाला अर्पण केले, तशी आमच्या आेंजळीत केवळ अन् केवळ कृतज्ञतेची सुमने आहेत. गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर ही सुमने आम्ही आपल्या चरणी अर्पिलेली आहेत. भावाश्रूंचा अभिषेकही केला आहे. आमच्यावर कृपा करून हृदयमंदिरी विराजमान व्हा ! परम दयाळू गुरुराया, आम्ही तुम्हाला अनन्यभावे शरण आलो आहोत. सनातनचा साधकरूपी प्रत्येक जीव किती भाग्यवान आहे ! माता, पिता, बंधू, आप्त, स्वकीय यांच्या रूपात तुम्हीच लाभला आहात आम्हाला ! कलियुगाच्या घोर अंधकारात प्रकाशमान चैतन्यस्वरूपात आमच्या समवेत असल्यासाठी आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत !
गुरुचरणी सदैव कृतज्ञ रहावे ।
मोल आयुष्याचे जाणूनी घ्यावे ॥
गुरूंमध्ये देवस्वरूप पहावे ।
चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे ॥
साधकांनी साधना करून जीवनमुक्त व्हावे, हीच खरी कृतज्ञता व्यक्त करणे होय !
- सध्याच्या घोर कलियुगात कोट्यवधी जिवांमध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करण्याची अनमोल संधी प्राप्त झाली.
- चैतन्याचे व्यासपीठ असणार्या आणि आनंदी जीवन अनुभवायला देणार्या आश्रमात वास्तव्य करण्यास मिळाले.
- सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक साधकाचे भाग्यच जणू उजळले आहे. ‘सनातन संस्थे’विना आपले जीवनच उरलेले नाही’, असेच साधकांना वाटते.
- देवाची भक्ती कशी करायची ? स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करायचे ? कोणत्याही प्रसंगात स्थिर आणि आनंदी कसे रहायचे ? याविषयीचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले.
- जे स्वतःच ईश्वर आहेत, असे अनमोल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात महान गुरु लाभले.
- आपत्काळ वेगाने चालू झालेला असतांनाही भगवंतरूपी परात्पर गुरुदेव आपल्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना गतीने करवून घेत आहेत.
- साधकांमध्ये श्रद्धा, भाव, तळमळ, तत्परता, आज्ञापालन हे सर्व गुरुदेवच निर्माण करत आहेत.
- कलियुगात जेथे संतदर्शनही दुर्लभ आहे, तेथे त्यांचा प्रतिदिन सत्संग लाभत आहे.
- भक्ती अनुभवण्यासाठी देवाने आपल्याला सेवारूपी माध्यम दिले आहे. या सेवेतूनच देवापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला सापडला आहे.
- देव प्रत्येक वेळी योग्य विचार देऊन घडवत आहे, सर्व काही सांगत आहे.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांशी नाळ जोडली जाणे, हे सनातनच्या साधकांचे महद़्भाग्यच !
आईच्या उदरात असतांना ‘मी कोण आहे ?’ हे जगाला ज्ञात होण्यापूर्वी सनातनच्या साधकांची नाळ सूक्ष्मरूपाने (निर्गुणातून) परात्पर गुरुदेवांशी जोडली गेली. त्यामुळे तो जीव सनातनमय झालेलाच होता. स्थुलातून सनातनच्या संपर्कात आल्यावर साधकरूपी जीव कृतार्थ झाला. आईपेक्षाही गुरुमाऊली भेटली, याची ओढ, त्यातील आनंद अन् ती भावावस्था अवर्णनीय आहे. जिवाशी नाळ जोडून त्याला आनंदस्वरूपाकडे नेणार्या गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
सनातनचे साधक सर्वाधिक आनंदी का ?
समाजातील अनेकांना प्रश्न पडतो की, कलियुगात सर्वत्र इतक्या समस्या, अडचणी आणि संकटे असतांनाही सनातनचे साधक इतके आनंदी कसे काय राहू शकतात ? त्यांना कधी ताण, काळजी भेडसावत नसेल का ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, तर जाणवते, ती केवळ आणि केवळ परात्पर गुरुदेवांची साधकांवर असलेली कृपा ! त्यांच्यामुळेच सनातनच्या साधकांच्या जीवनातील अनमोल क्षणांतील आनंद आणि अनुभूती ही अद्वितीय आहे. साधकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणामध्ये गुरुदेवांच्या माध्यमातून श्रीकृष्ण सतत आनंद आणि आनंदच भरत असतो. तो प्रत्येक वस्तू, सजीव-निर्जीव गोष्टी आणि कणकण यांत चैतन्य भरून ठेवत असतो. या अद्वितीयतेला खरंच तोड नाही. त्यामुळेच तर साधक ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ याची प्रचीती अखंड घेतात. यासाठी कृतज्ञता !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.७.२०२३)