जागतिक स्तरावर ३ जुलै ठरला आतापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस !
‘एल्-निनो’चे परिणाम, तसेच ‘कार्बन डायऑक्साईड’चे वाढते उत्सर्जन कारणीभूत !
लंडन (इंग्लंड) – जागतिक स्तरावर सरासरी तापमानात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली असून जेव्हापासून तापमानाच्या नोंदी ठेवणे चालू झाले, तेव्हापासून म्हणजे गेल्या १२५ वर्षांपासून ३ जुलै २०२३ हा दिवस आतापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस ठरला. ‘यू.एस्. नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रेडिक्शन’नुसार या दिवशी जगभरातील सरासरी तापमान १७.०१ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. ‘एल्-निनो’ परिणाम आणि ‘कार्बन डायऑक्साईड’च्या वाढत्या उत्सर्जनामुळे ही वाढ झाल्याचे निरीक्षण वैज्ञानिकांनी नोंदवले आहे. याआधी ऑगस्ट २०१६ मध्ये १६.९२ अंश सेल्सियस तापमान हे सर्वाधिक होते. येणार्या दीड वर्षात तापमानाचे विक्रम पुन:पुन्हा मोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
World registers hottest day ever recorded on July 3 https://t.co/Javktttbif pic.twitter.com/faRBuouMSA
— Reuters (@Reuters) July 4, 2023
१. या वर्षाच्या आरंभी स्पेनमध्ये वाढलेले विक्रमी तापमान आणि त्यानंतर आशियातील अनेक देशांमध्ये सागरी उष्णतेच्या लाटा आल्या. असे सहसा होतांना दिसत नाही. चीनमध्ये याच आठवड्यात अनेक ठिकाणी ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान होते. अमेरिकेतील दक्षिण भागातही उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
२. वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार जून मासात ‘एल्-निनो’चे परिणाम दिसू लागले. याचा अर्थ पॅसिफिक महासागरात अतिरिक्त उष्णता निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक सरासरी तापमानात वृद्धी झाली.
३. अधिक तापमानाचा परिणाम हा दोन्ही ध्रुवांवरही होत आहे. अँटार्टिकामध्ये जुलै मासाचा विक्रम मोडला गेला असून तेथे ८.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
‘एल्-निनो’ म्हणजे काय ?केंद्रीय आणि पूर्व पॅसिफिक महासागराच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रातील पाणी हे मोठ्या प्रमाणात उष्ण होण्याच्या प्रक्रियेला ‘एल्-निनो’ म्हटले जाते. ही प्रक्रिया नियमित होत नसून २ वर्षे ते एका दशकभरात केव्हाही होते. ही प्रक्रिया प्रत्येक वेळी वेगळी असते. यामुळे जागतिक सरासरी तापमानात वाढ होते. |
संपादकीय भूमिकाया परिस्थितीला वैज्ञानिक उपकरणांच अतीवापर कारणीभूत आहे ! आताच यावर लगाम घातला नाही, तर ही परिस्थिती आणखी भयानक होईल आणि पुढील पिढ्यांच्या जिवावर बेतेल, हे जाणा ! |