सनातन संस्थेच्या वतीने गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत मान्यवर वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन
‘लव्ह जिहाद’विषयी प्रत्येक हिंदूने समाजात जागृती करणे आवश्यक ! – सौ. शुभदा कलंगुटकर, डिचोली
सांखळी – स्वतःच्या कुटुंबातील, त्याचप्रमाणे ओळखीच्या मुली अन्य धर्मियांसमवेत फिरतात का ? त्यांचे मित्र कोण आहेत ? त्यांचे वागणे-बोलणे यांवर आपण लक्ष ठेवणे सद्यस्थितीत अत्यंत आवश्यक बनले आहे. ‘लव्ह जिहाद’चा धोका वाढत चाललेला आहे. याविषयी प्रत्येक हिंदूने समाजात जागृती करणे आवश्यक आहे. महिलांनी येत्या मकरसंक्रांतीला वाण म्हणून अन्य साहित्य देण्याऐवजी ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेला ग्रंथ द्यावा.
यात दिलेली माहिती आणि लिखाण हे अभ्यासपूर्ण अन् अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन सांखळी येथे गुरुपौर्णिमा महोत्सवात डिचोली येथील समाजसेविका सौ. शुभदा कलंगुटकर यांनी केले.
‘लव्ह जिहाद’च्या संकटापासून वाचण्यासाठी हिंदूंना आता प्रखर हिंदुत्वनिष्ठ व्हावे लागेल ! – सौ. शुभांगी गावडे, गोवा राज्य प्रमुख, राष्ट्रीय मातृशक्ती
म्हापसा – ‘लव्ह जिहाद’च्या संकटापासून स्वतःच्या मुलींना वाचवण्यासाठी हिंदूंना आता प्रखर हिंदुत्वनिष्ठ होण्याविना पर्याय नाही. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या अनुषंगाने गेली कित्येक वर्षे चांगले कार्य करत आहेत. अशा कार्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. याच्या जोडीला सायंकाळी ७ वाजता दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे बंद करून पाल्यांना आवर्जून देवासमोर प्रार्थना, आरती आदी करण्यास सांगितल्यास त्यांच्यावर सुसंस्कार होतील, असे उद्गार राष्ट्रीय मातृशक्तीच्या गोवा राज्य प्रमुख तथा ‘हिंदू रक्षा महाआघाडी’च्या सुकाणू समितीच्या सदस्या सौ. शुभांगी गावडे यांनी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रमुख अतिथी या नात्याने बोलतांना काढले.
सनातन संस्थेच्या कार्याला सढळहस्ते सहकार्य करणारे म्हापसा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीर कांदोळकर यांचा या वेळी प्रमुख अतिथी सौ. शुभांगी गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शूरविरांचा सत्य इतिहास शिकवा ! – संदीप पाळणी, राज्य सहकार्यवाह, ‘भारतमाता की जय’
पणजी – भारतात गुरुपरंपरेला मोठे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून देशात गुरुपरंपरा आहे. धर्मसंस्थापनेच्या कार्यातही गुरूंचा सहभाग पुष्कळ महत्त्वाचा आहे. हिंदु राष्ट्र होण्यासाठी सर्व शाळांमध्ये शिक्षकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी शूरविरांचा सत्य इतिहास शिकवला पाहिजे, तेव्हाच आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असे मार्गदर्शन ‘भारतमाता की जय’ संघटनेचे राज्य सहकार्यवाह तथा ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे सहनिमंत्रक श्री. संदीप पाळणी यांनी केले. पणजी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते.
या महोत्सवात सनातनच्या कार्याला बहुमूल्य सहकार्य करणारे ‘इथरनेट एक्सप्रेस प्रा.लि.’ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सागर गोवेकर यांचा प्रमुख अतिथी श्री. संदीप पाळणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केवळ गुरूंमुळेच मनुष्याला परिपूर्ण ज्ञान मिळते ! – डॉ. मनोज कामत, प्राचार्य, धेंपे महाविद्यालय, पणजी
फोंडा – भारतातील गुरु-शिष्य परंपरा ही उच्च दर्जाची आहे. या परंपरेमुळे भारत पुन्हा विश्वगुरु पदावर पोचू शकतो. मानवाची प्रगती केवळ शिक्षणानेच होते असे नाही, तर गुरूंमुळेच मनुष्याला परिपूर्ण ज्ञान मिळते. गुरु म्हणजे शिक्षक एवढा संकुचित अर्थ नाही. अध्यापक, उपाध्याय, मार्गदर्शक, आचार्य, द्रष्टा आणि गुरु, अशी गुरूंची ६ रूपे आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यासारख्या महामानवांनाही गुरुगृही राहून शिक्षण घ्यावे लागले. आपली संस्कृती आणि परंपरा महान आहे. गुरूंमुळेच जीवनाला व्यापक स्वरूप येते. भवसागरातून तरून जाण्यासाठी गुरूंविना तरणोपाय नाही, असे उद्गार पणजी येथील धेंपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी पाटणतळी, नागेशी, बांदोडा येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रमुख अतिथी या नात्याने बोलतांना काढले.