‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल
विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – जेथे ‘राम’ आहे, तेथे ‘काम’ चालत नाही आणि जेथे ‘काम’ आहे, तेथे ‘राम’ नसतो. पाश्चात्त्यांमध्ये मोक्षाची संकल्पना कुठे नाही. काम म्हणजे माया आहे आणि माया जिवाला पुष्कळ दुःख देते. ‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे) ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. यामुळे भारतातील कुटुंबव्यवस्था नष्ट होत आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे हे प्रकार वाढत आहेत. कलीच्या प्रभावामुळे ‘इष्ट’ हे ‘अनिष्ट’ वाटते आणि ‘अनिष्ट’ ते ‘इष्ट’ वाटते. ‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांविषयीही हेच चालू आहे.
आगीत तेल टाकले, तर जशी आग अधिक भडकते, त्याप्रमाणे भोगांची तृप्ती न होता ते अधिक वाढतात. आपली संस्कृती भोगवादी नव्हे, तर निवृत्तीपोषक आणि भारतीय वर्णव्यवस्थाही निवृत्तीपोषक आहे. अल्लाउद्दीन खिलजी याच्या हाती पडू नये, यासाठी राणी पद्मिनीसह १६ सहस्र महिलांनी अग्नीप्रवेश केला, अशी भारताची महान संस्कृती आहे. ‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र आहे, असे परखड उद़्गार बंगाल येथील ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’चे उपसचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी काढले. ते १६ ते २२ जून या कालावधीत पार पडलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात उपस्थितांना संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथील ‘जांबाज हिन्दुस्थानी सेवा समिती’चे मार्गदर्शक पू. योगी देवराहा जंगल महाराज, रायपूर (छत्तीसगड) येथील ‘श्री नीलकंठ सेवा संस्थान’चे संस्थापक पंडित नीलकंठ त्रिपाठी महाराज आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद़्गुरु नंदकुमार जाधव हे उपस्थित होते.
ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य ! – सद़्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती
हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व धर्माचरण आणि आध्यात्मिक साधना केल्याने अनुभवास येते. त्या वेळी आपल्यामध्ये खरा धर्माभिमान निर्माण होतो. त्यानंतर समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे खरे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. धर्माचरण आणि आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्ती पवित्र होते. धर्माभिमानी व्यक्ती धर्माचा अनादर करत नाही आणि इतरांना तसे करू देत नाही. तसेच होणारी धर्महानी थांबवते. अशीच व्यक्ती धर्मरक्षणाचे कार्य करू शकते. यावरून असे लक्षात येते की, हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य केवळ धर्माचे पालन करणारे आणि आध्यात्मिक साधना करणारे हिंदूच करू शकतात अन् रामराज्य आणू शकतात.
एवढेच नाही, तर आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम केल्याने निःस्वार्थ कर्मयोग होतो, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगतीही होते. धर्मरक्षणाचे कार्य अशी व्यक्तीच करू शकते. यावरून असे लक्षात येते की, हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य केवळ धार्मिक आणि साधना करणारे हिंदूच करू शकतात.
छत्तीसगडमधील काँग्रेस शासन हिंदुविरोधी ! – पंडित नीलकंठ त्रिपाठी महाराज, संस्थापक, श्री नीलकंठ सेवा संस्थान, रायपूर, छत्तीसगड
२५ आणि २६ डिसेंबर २०२१ या दिवशी रायपूर येथे धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या धर्मसंसदेमध्ये गांधीजींविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवला. या विरोधात साधू-संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. प्रभु श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती; पण गांधीजींवर कथित टीका केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावरून छत्तीसगड सरकारला प्रभु श्रीरामांपेक्षा गांधीजी अधिक महत्त्वाचे वाटतात. राज्यात हिंदु देवतांचे विडंबन झाल्यावर ती करणार्यावर कारवाई न करता प्रशासनाकडून सर्वप्रथम त्याविषयी संताप व्यक्त करणारे धार्मिक संत आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांच्यावर कारवाई करण्यात येते. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हा हिंदुत्वनिष्ठांनी राज्यस्तरीय तीव्र आंदोलन केले होते. तेव्हा दबावापोटी नंदकुमार बघेल यांना ३ दिवसांसाठी अटकेत ठेवण्यात आले होते.
संपादकीय भुमिका‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र रोखणे हे धर्मकर्तव्यच ! |