हिंदु राष्ट्राच्या दिशेने…!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली. त्यानंतर सच्चिदानंद डॉ. जयंत आठवले यांनी हिंदु राष्ट्राची (रामराज्याची) संकल्पना मांडली. आज देशभरात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्यरत आहेत; परंतु त्यांच्यात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची क्षमता आहे, असे म्हणू शकत नाही. बहुसंख्य हिंदु जरी राष्ट्राभिमानी असले, तरी अद्याप आध्यात्मिकदृष्ट्या ते सक्षम आहेतच असे नाही. आदर्श राष्ट्राचा पाया हा आध्यात्मिक बळावरच उभा राहू शकतो. आज आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी, फुटीरतावादी, तस्कर, माफिया यांमुळे देश काही बाह्य शक्तींपासून असुरक्षित आहे. जगातील सर्व भ्रष्टाचार जणू आपल्याच देशात एकत्रित झाला असल्याप्रमाणे भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. देशात मुली आणि स्त्रिया सुरक्षित नाहीत. देवता, धर्म, धर्मग्रंथ, राष्ट्रपुरुष आदींचे विडंबन होत आहे. काही वेळा तर हिंदु धर्माचा अवमान करण्याची स्पर्धाच लागली आहे कि काय ? असे वाटते. ‘आदिपुरुष’सारखा चित्रपट हे धर्माच्या नावाखाली दिशाभूल झालेल्या हिंदूंचे उत्तम उदाहरण आहे. हिंदुविरोधी विचारधारा पसरवण्याचे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र समाजमाध्यमांतून पसरवले जात आहे. त्यामध्ये हिंदु धर्मविरोधी कित्येक अपसमज आणि खोटी कथानके निर्माण करून पसरवली जात आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हे अधिकच फोफावले आहे. आतंकवादी आणि साम्यवादी यांच्या अभद्र युतीमुळे टिपू सुलतान, औरंगजेब यांच्या उदात्तीकरणाला ऊत आला आहे.
एक जमेची बाजू ही आहे की, हिंदू जागृत होत आहेत. ‘हे सर्व हिंदु धर्मावरील आघात आहेत’, हे हिंदूंना आता लक्षात येत आहे. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांचेही संघटन वाढत असल्याचे मार्चे, आंदोलने, तसेच समाजमाध्यमे यांतून लक्षात येत आहे. खरे तर प्रभु श्रीराम हे हिंदूंच्या आदर्श राजाचे उदाहरण म्हणून संपूर्ण विश्वात उभे आहेत. अगदी मोहनदास गांधी यांनीही ‘रामराज्य’ असा शब्द वापरला होता. ‘श्रीरामासारखे आदर्श राज्य असावे’, ही प्रत्येक जागरूक हिंदूची इच्छा आहे. ‘हिंदूंचा द्वेष आणि अन्य धर्मियांचे लांगूलचालन’ हे काँग्रेसचे धोरण सर्वांच्या लक्षात आले आहे. हिंदु धर्माची महती लक्षात येऊ लागल्याने हिंदूंचा स्वाभिमानही आता जागृत होत आहे. हिंदूंमधील हेच संघटन आणि स्वाभिमान वाढवून आता हिंदु राष्ट्र येईपर्यंत त्यांना प्रयत्नरत रहायचे आहे. काळानुसार ते येणारच आहे; मात्र हिंदूंनी संघटित होऊन त्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांची साधना होणार आहे, हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
– सौ. रमा देशमुख, नागपूर