साधकांनो, रुग्णाईत साधकांना साहाय्य करून त्या माध्यमातून गुणवृद्धी करा !
‘सनातनच्या आश्रमांत वेगवेगळ्या वयोगटातील साधक निवास करतात. यांमध्ये काही वयस्कर आणि रुग्णाईत साधकांचाही समावेश असतो. आश्रमात निवास करत असलेल्या रुग्णाईत साधकांची सेवा करतांना रुग्ण साधकांच्या नातेवाइकांना किंवा त्या रुग्ण साधकाची सेवा करणार्या साधकाला साहाय्याची आवश्यकता असते, उदा. रुग्णाला पलंगावरून आसंदीवर आणि आसंदीवरून पुन्हा पलंगावर घेणे इत्यादी. त्या वेळी त्यांनी अन्य साधकांना साहाय्याविषयी विचारले असता काही साधक ‘वेळ नाही’, असे सांगतात किंवा इतर कारणे सांगतात. त्या वेळी रुग्ण साधकाच्या नातेवाइकाला सेवेत अडचण येते.
आश्रमातील प्रत्येक साधक तन-मन-धनाचा त्याग करून आश्रमात येऊन पूर्णवेळ सेवा करत आहे. ‘रुग्णाईत साधकांची काळजी घेणे’, हे आश्रमातील प्रत्येक साधकाचे कर्तव्य आणि साधनाही आहे. सनातन हे एक कुटुंब आहे. साधकांना साहाय्य केल्याने प्रेमभाव आणि कुटुंबभावना वाढते. आपत्काळात साधकांवर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ शकते. साधकांनी स्वतःतील ‘इतरांना साहाय्य करणे’, हा गुण वाढवला, तर आपत्काळात अन्य साधकांवर संकट आल्यावर त्यांच्या साहाय्याला धावून जाता येईल आणि त्याला मनापासून साहाय्य करता येईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.६.२०२३)