परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आणि अनन्य भोळा अन् उत्कट भाव असलेल्या पाळे, शरदोन (गोवा) येथील सनातनच्या १२२ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !
पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची आज प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्या १२२ व्या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे आज ५ जुलै या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत.
पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांना सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
पू. (सौ.) शालिनी मराठे यांचा आरंभीचा जीवनप्रवास सर्वसामान्यांप्रमाणे किंबहुना थोडा खडतरच होता, असे म्हटले तरी चालेल; पण त्यांच्या जीवनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आल्यापासून त्यांचे जीवन अधिकाधिक आनंदी अन् समाधानी होत गेले. त्यांचा मूळ स्वभाव सात्त्विक, शांत आणि देवावर श्रद्धा असणारा असल्यामुळे गुरुप्राप्ती होताच त्यांचे जीवन अधिकच समृद्ध होत गेले. त्यांनी संसार करतांनाच साधनाही मनापासून आणि झोकून देऊन केली. त्यामुळे गुरुकृपेने काही वर्षांतच त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आणि त्या जीवनमुक्त झाल्या. त्यांना श्री गुरूंविषयी लिहितांना ‘किती लिहू ? त्यांचे गुण कसे गाऊ ? कुठल्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करू ?’, असे होऊन जायचे. त्यांच्यातील या भावामुळे त्यांनी लिहिलेले लेख किंवा कविताही भावाने ओथंबलेल्या असायच्या. त्यामुळे ते लेख किंवा कविता वाचणार्यांचाही भाव जागृत व्हायचा.
‘गुरु प्रारब्ध नष्ट करत नाहीत, तर ते भोगण्याचे बळ देतात’ आणि ‘परिस्थिती स्वीकारणे ही सर्वोत्तम साधना आहे’, या गुरुवचनांवरील श्रद्धेनेच त्या कर्करोगासारख्या गंभीर दुखण्याला सामोर्या गेल्या. त्यांनी आलेली परिस्थिती स्वीकारली आणि त्या सतत गुरुस्मरणात राहिल्या. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या २९ दिवसांत त्या संतपदी विराजमान झाल्या. यांतून त्यांनी सर्व साधकांसमोर एक मोठा आदर्शच निर्माण केला आहे.
१. जन्म
‘३.११.१९४७ या दिवशी आरोस (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे माझा जन्म झाला. लहानपणापासून माझी प्रकृती चांगली होती. कधीतरी ज्वर येत असे; पण त्याचा फारसा त्रास झाला नाही.
२. देवाची आवड असणे
माझ्या कुटुंबातील वातावरण धार्मिक होते. आमच्या कुटुंबात सर्व सण, उत्सव आणि कुलाचार धार्मिक पद्धतीने साजरे केले जात असत. त्यामुळे मला लहानपणापासूनच देवाची आवड होती.
३. कौटुंबिक स्थिती
आमचे एकत्र कुटुंब आणि शेतीचा व्यवसाय असल्याने आर्थिक स्थिती बेताचीच होती.
४. शिक्षण
माझे प्राथमिक शिक्षण आरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झाले. पुढचे शिक्षण मी वेंगुर्ले येथे आजोळी राहून घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मी माझ्या आईची (सौ. रुक्मिणी सिद्धये हिची) मैत्रीण सौ. गोरे यांच्या घरी राहून घेतले. श्री. गोरे यांची खानावळ होती. त्यांना जमेल, तेवढे साहाय्य करत मी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधून पदवीपर्यंतचे (बी.ए.) शिक्षण पूर्ण केले. पुण्याला मी टिळक महाविद्यालयातून ‘बी.एड्.’ केले. नंतर आम्ही गोवा येथे रहायला आल्यावर मी मुंबई विश्वविद्यालयातून ‘मराठी’ हा विषय घेऊन ‘एम.ए.’चे शिक्षण पूर्ण केले.
माझे यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सासूबाई पू. (कै.) सीताबाई मराठे (सनातनच्या २१ व्या (व्यष्टी) संत) आणि सासरे कै. रामचंद्र बाळकृष्ण मराठे यांनी मला वेळोवेळी साहाय्य केले अन् प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी विवाहानंतरही ‘बी.एड्.’ केले आणि नोकरी करत ‘एम्.ए.’पर्यंतचे शिक्षण घेऊ शकले. त्यासाठी मी त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञ आहे.
५. परिस्थितीशी जुळवून घेऊन रहाणे
लहानपणापासून शिक्षणासाठी मी घरापासून लांब आजोळी राहिले होते. त्यानंतर श्री. गोरे यांच्याकडे राहिल्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची आवड-नावड नव्हती. ‘समोर आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला पाहिजे’, याची जाणीव ठेवून मी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला.
६. नोकरी
भावंडांमध्ये मी मोठी होते. मला दोन लहान भाऊ होते. माझे ‘बी.ए.’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘घरास आर्थिक साहाय्य व्हावे’, या दृष्टीने मी वयाच्या २२ ते २४ वर्षांपर्यंत ४ उच्च माध्यमिक विद्यालयांत (हायस्कूलमध्ये) शिक्षिका म्हणून नोकरी केली. आमच्या घरी शिकलेले कुणी नसल्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी मलाच सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागत असत. प्रत्येक वेळी मला विद्यालयात १ वर्षापुरतीच नोकरी मिळत असे. त्यामुळे मला पुन्हा दुसरे विद्यालय शोधावे लागत असे. असे असूनही देवाच्या कृपेने मला प्रतिवर्षी वेगळ्या विद्यालयात नोकर्या मिळाल्या. नोकरी करत असतांना मी कधी चुकारपणा न करता तत्त्वनिष्ठेने नोकरी केली. नोकरीचे स्थळ घरापासून लांब असल्याने नोकरीच्या ठिकाणी मला खोली घेऊन रहावे लागे. तेव्हा गावातील लोक लग्न न झालेल्या मुलीला खोली द्यायला सिद्ध होत नसत. त्यामुळे मी माझ्या दोन लहान भावांनाही माझ्या समवेत ठेवून घेऊन त्यांना शिक्षणासाठी साहाय्य करत असे.
नोकरी करत असतांना देवाने मला वेळोवेळी साहाय्य केल्यामुळेच मी ३१ वर्षे नोकरी करू शकले. वर्ष २००१ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
७. वैवाहिक जीवन
२४.१२.१९७२ या दिवशी माझा विवाह श्री. प्रकाश रामचंद्र मराठे यांच्याशी झाला. विवाहानंतर मी त्यांच्या समवेत पुण्याला त्यांच्या काकांकडे रहायला गेले. वर्ष १९७३ मध्ये आम्ही गोव्याला आलो आणि पाळे, शिरदोन येथे स्थायिक झालो.
८. रहाणीमान
माझे रहाणीमान साधेच आहे. आम्हाला घरातच सर्वकाही मिळत असल्याने आमचे उपाहारगृहात खाणे-पिणे फार अल्प प्रमाणात असे. यजमान श्री. प्रकाश मराठे यांचे वडील गावात पौरोहित्य करत असत. गावातील मंदिरांत ते पूजा करायला जायचे. त्यामुळे घरात सोवळे-ओवळे कडक असायचे. समाजात मला ‘ही पुरोहितांची सून आणि शिक्षिका’ म्हणून पुष्कळ प्रेम मिळायचे.
९. साधनेत नसतांनाही देवाने मोठ्या संकटातून केलेले रक्षण !
एकदा थिवी (गोवा) येथे आमच्या मिनीबसला अपघात झाला. त्यात बर्याच लोकांना दुखापत झाली. माझ्या डोक्यात काच घुसली होती आणि मी बसमधून बाहेर फेकले गेले होते. माझी शुद्ध हरपली होती. माझ्या अंगावर सगळे दागिने होते. काही वेळाने मी शुद्धीवर आल्यावर कुणीतरी येऊन माझी चौकशी केली आणि दुचाकीवरून मला जवळच्या आधुनिक वैद्य घुमटकर यांच्या रुग्णालयामध्ये नेले. आधी ते मला भरती करून घ्यायला सिद्ध नव्हते; पण मी पुन्हा काही वेळ बेशुद्ध झाले. तेव्हा माझी स्थिती बघून त्यांनी मला भरती करून घेतले. मी शुद्धीवर आल्यावर त्यांना घरचा (माझ्या भावाचा पत्ता) आणि दूरभाष क्रमांक दिला. तेव्हा त्यांनी दूरभाष करून भावाला बोलावून घेतले. त्यानंतर माझ्या भावाने मला पणजी येथील शासकीय (सरकारी) रुग्णालयात भरती केले. पडताळणीनंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘डोक्यावरील काचेचा घाव फार खोल नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही; पण घाव थोडा जरी अधिक खोल गेला असता, तर त्याच वेळी यांचा प्राण गेला असता.’’ अशा प्रकारे देवाने ‘कुणाच्यातरी माध्यमातून माझे रक्षण केले’, असे मला वाटले. ‘माझा अपघात झाला, त्या वेळी मी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करत होते’, एवढेच मला नंतर आठवले.
१०. सनातन संस्थेशी झालेला संपर्क !
१० अ. प.पू. डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन पुष्कळ आवडल्यामुळे आम्ही कुटुंबियांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करायला आरंभ करणे : एकदा प.पू. डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) पणजी येथे ‘स्वामी विवेकानंद सभागृहात’ मार्गदर्शन होते. माझा छोटा भाऊ (श्री. अशोक सिद्धये) आणि आतेभाऊ श्री. उदय बर्वे त्या मार्गदर्शनासाठी गेले होते. माझ्या दोन्ही भावांना ते मार्गदर्शन पुष्कळ आवडले. त्यांनी माझ्या यजमानांना (श्री. प्रकाश मराठे यांना) प.पू. डॉक्टरांच्या पुढच्या मार्गदर्शनाला जायला सांगितले. यजमानांनाही देवाची आवड होती. त्यामुळे १०.१.१९९३ या दिवशी यजमान प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाला गेले होते. त्यांनी घरी येऊन आम्हाला सांगितले, ‘‘प.पू. डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मला पुष्कळ आवडले.’’ त्यानंतर आम्ही (मी, यजमान आणि सासूबाई पू. (कै.) सीताबाई मराठे) प.पू. डॉक्टरांच्या प्रत्येक मासाला होणार्या अभ्यासवर्गाला जाऊ लागलो.
१० आ. प.पू. डॉ. आठवले यांच्याशी प्रत्यक्ष भेट आणि त्यांनी नामजप करण्याविषयी केलेले मार्गदर्शन ! : एकदा आम्ही तिघेही फोंडा (गोवा) येथील ‘शहनाई सभागृहा’त प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाला गेलो होतो. तेव्हा मला आणि सासूबाईंना परम पूज्य भेटले. आम्हाला आमचा कुलदेव आणि कुलदेवी ठाऊक नव्हती; म्हणून ते आम्हा दोघांना (मला आणि यजमानांना) म्हणाले, ‘‘तुम्ही दोघे ‘श्रीलक्ष्मी-नारायणाय नमः ।’, असा नामजप करा’’ आणि सासूबाईंना म्हणाले, ‘‘तुम्ही ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू ठेवा.’’ तेव्हापासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार आमच्या साधनेला आरंभ झाला. आम्ही कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला आरंभ केला.’
(क्रमशः)
– सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२२)
(हे लिखाण सौ. शालिनी मराठे संत होण्यापूर्वीचे आहे.)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |