आतंकवादावर निर्णायक कारवाई करणे आवश्यक ! – पंतप्रधान मोदी

शांघाय सहकार्य परिषदेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

नवी देहली – काही देश आतंकवाद हे स्वतःच्या देशाचे धोरण असल्याप्रमाणे अन्य देशांत आतकंवादी कारवाया करत आहेत. ते आतंकवाद्यांना आश्रय देत आहेत. आतंकवादाचे समर्थन करणार्‍यांविषयी दुटप्पी भूमिका घेण्यात येऊ नये. आतंकवाद जागतिक आणि क्षेत्रीय कार्यांसाठी धोका बनला आहे. त्यामुळे आतंकवादावर निर्णायक कारवाई करणे आवश्यक आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांघाय सहकार्य परिषदेत बोलतांना केले. ही परिषद ४ जुलै या दिवशी ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि अन्य देशांचे प्रमुख उपस्थित होते. भारताकडून ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

१. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन या वेळी म्हणाले की, परिषदेच्या आयोजनासाठी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देेतो. आंतरराष्ट्रीय सूत्रांवरील भारताच्या दृष्टीकोनाचे रशिया समर्थन करतो. आपल्याला या परिषदेतील सदस्य देशांतील संबंध अधिक सशक्त करणे पुढेही चालू ठेवायचे आहेत. या परिषदेचे मुख्य सूत्र अफगाणिस्तानमधील सध्याची स्थिती हे आहे. आपल्या सर्वांचे प्राधान्य आतंकवाद, कट्टरतावाद आणि अमली पदार्थांची तस्करी यांच्या विरोधात लढणे हे आहे.

२. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आर्थिक सहकार्यावर भूमिका मांडली, तर पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अफगाणिस्तानला साहाय्य करण्याचे आवाहन केले.

संपादकीय भूमिका 

आतंकवादावर निर्णायक कारवाईसाठी भारतानेच पुढाकार घेऊन पाकला संपवणे आवश्यक आहे. ‘अन्य कुणाकडून ही कारवाई होईल’, अशी भ्रामक अपेक्षा न करता आता हे स्वतःचेच दायित्व असल्याचे लक्षात घेऊन भारतानेच हे करणे आवश्यक आहे !