दासबोधातील सद़्गुरुस्तवन आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
गुरुस्तवन पुष्पांजली
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
‘माझ्यामध्ये अशा प्रकारची काही वैशिष्ट्ये थोडीफार असतील’, याची मला कल्पनाही करता येत नाही. ती वैशिष्ट्येे जाणून घेऊन अशा शब्दांत व्यक्त करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य शब्दांपलीकडचे आहे. त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’
-परात्पर गुरु डॉ. आठवले (३.७.२०२३) |
१०. सद़्गुरूंचे वर्णन करता येणे सर्वथा असंभव !
‘आतां सद़्गुरु वर्णवेना ।
जेथें माया स्पर्शों सकेना ।
तें स्वरूप मज अज्ञाना । काये कळे ॥
न कळे न कळे नेति नेति ।
ऐसें बोलतसे श्रुती ।
तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ – दासबोध, दशक १, समास ४, ओवी १ आणि २
अर्थ : ‘सद़्गुरूंचे स्तवन करावे’, अशी मला इच्छा झाली; पण ज्यांच्यापर्यंत माया पोचूही शकत नाही, अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला कसे होणार ? त्यामुळे ‘सद़्गुरूंचे वर्णन करताच येत नाही’, असे म्हणावे लागत आहे. श्रुती ही आत्मविद्येची जननी असून तीसुद्धा ‘नेति नेति ।’ म्हणजे ‘मला कळत नाही, कळत नाही’, असे ज्याच्याविषयी म्हणते, त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी समर्थ असेल ?’
१० अ. ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करण्यास शब्द अन् मती असमर्थ ठरतात, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची महानताच एवढी आहे की, या ‘मायामय जगतातील कोणते शब्द वापरून त्यांची स्तुती करावी ?’, हेच बुद्धीला समजत नाही. श्रुतीसुद्धा ‘नेति नेति’, असे म्हणून या गुरुतत्त्वाचे वर्णन करण्यास असमर्थता दर्शवतात, तेथे आपली काय कथा ! या मायामय जगतात देहधारी रूपात अवतार धारण करूनही जे मायेपासून पूर्णतः अलिप्त आहेत, अशा गुरूंपुढे शरणागत होऊन साष्टांग दंडवत घालणे आणि ‘त्यांच्या चरणांशी अखंड लीन रहाणे’, हेच शिष्याचे कर्तव्य असते.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, आपल्या स्वरूपाचे वर्णन करणे, खरोखरंच अत्यंत कठीण आहे; परंतु समर्थ रामदासस्वामींनी अलौकिक शब्दसामर्थ्याने केलेल्या सद़्गुरु स्तवनामुळे आपल्या अवतारत्वाचे काही पैलू आमच्या ध्यानात आले. त्याबद्दल आपल्या आणि समर्थ रामदासस्वामींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
गुरुदेवा, ‘आपल्या अवतारी कार्याची महती आम्हाला नित्य उलगडू दे आणि अखंड शरणागत स्थितीत रहाता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना !’
(समाप्त)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (३.७.२०२३)