परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती !
१. ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन करणे आणि ‘उद्या मी तुला काहीतरी देणार आहे, तू सिद्ध रहा !’, असे त्यांनी सूक्ष्मातून सांगणे
‘ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी, १०.५.२०२३ या दिवशी मी परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन करत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून त्यांचा आवाज आला, ‘अपाला, उद्या मी तुला काहीतरी देणार आहे. तू सिद्ध रहा !’ तेव्हा मी नारायणरूपी गुरुदेवांना सूक्ष्मातून म्हटले, ‘हे देवा, ‘मला साक्षात् तुमचे दर्शन मला लाभणार’, याहून अनमोल काय आहे ?’ तेव्हा गुरुदेव केवळ स्मितहास्य करून म्हणाले, ‘उद्याची प्रतीक्षा कर.’
२. ब्रह्मोत्सव पहातांना आलेल्या अनुभूती
अ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची रथयात्रा पाहिल्यावर नारायणाने मला सूक्ष्मातून सांगितले, ‘तुला तिरुपति बालाजीविषयी भाव वाटतो ना ! साक्षात् गुरुदेवांच्या रूपात तिरुपति बालाजी अवतरला असून हा दिव्य ब्रह्मोत्सव साजरा होणार आहे. तो तू मन भरून डोळ्यांच्या पापण्याही न मिटता पहा आणि हृदयमंदिरात कोरून ठेव !’
आ. काय वर्णावा तो दिवस ! साक्षात् तिरुपति बालाजीच भक्तांना दर्शन देण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये अवतरला. सच्चिदानंद गुरुदेवांचे हे तिरुपति रूप पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि ‘मी जणू प्रत्यक्ष वैकुंठातच बसून हा सोहळा अनुभवत आहे’, असे मला जाणवले. ‘भगवंताने मला साक्षात् तिरुपतीच्या रूपात दर्शन देऊन माझी इच्छा पूर्ण केली’, असे मला वाटले.
इ. रथयात्रा चालू असतांना कधी ‘रथ पाण्यावर असून भगवंताचा नौकाविहार चालू आहे, तर कधी रथ आकाशात उडत असून भगवंताचे त्रिलोकात भ्रमण होत आहे’, असे मला वाटत होते.
ई. भगवंतस्वरूप गुरुदेवांनी परिधान केलेले वस्त्रालंकार अतिशय सुंदर होते. त्यांचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. ‘त्यांची कांती ही मानवी कांती नसून साक्षात् नारायणाचीच कांती आहे’, असे मला वाटत होते.
उ. ‘मी एवढे काय केले, ज्यामुळे मला प्रत्यक्ष भगवंताला पहाता आले ?’, असे वाटून क्षणोक्षणी मला कृतज्ञता वाटत होती.
‘हे प.पू. गुरुदेवा, ‘आपल्याच अनंत कृपेमुळे मला साक्षात् दिव्य ‘ब्रह्मोत्सव’ अनुभवता आला’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.५.२०२३)
|