सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७२ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७२ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक साधकांनी भावाश्रूंसह गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
काही ठिकाणी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मान्यवर वक्त्यांनी ‘धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते. साधनेमुळेच अंतरातील दिव्य ऊर्जा जागृत होते. मनोबल वाढते. आत्मशक्ती जागृत होते. या दिव्यशक्तीच्या आधारे हिंदु धर्माचे, या देवभूमी भारताचे रक्षण सहजसुलभ होणार आहे. त्यामुळे देवभूमी भारताचे रक्षण आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा’, असे आवाहन उपस्थितांना केले.
ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवसनातन संस्थेच्या वतीने मराठी, कन्नड, इंग्रजी, तेलुगु, तमिळ आणि मल्ल्याळम् या भाषांमध्ये ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा’ महोत्सव पार पडले. |
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तिरुपती येथील श्री बालाजीचे दर्शन घेऊन व्यक्त केली कृतज्ञता !
तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील तिरुपती देवस्थानमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ३ जुलै २०२३ या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री बालाजीचे दर्शन घेऊन कृतज्ञतापुष्प अर्पण केले. ११ मे २०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पार पडला. त्यानंतर झालेल्या नाडीपट्टीच्या वाचनामध्ये सप्तर्षि म्हणाले, ‘‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तिरुपतीला जावे आणि ब्रह्मोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी.’’ यानुसार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारी ४ वाजता तिरुपती येथे जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेतले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी, सर्व साधकांच्या आरोग्यासाठी आणि साधकांभोवती संरक्षणकवच निर्माण होण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर होण्यासाठी श्री बालाजीच्या चरणी प्रार्थना केली.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |