ली वॉर्नर आणि अन्याय सहन न करण्याची सभ्यता पाळणारे भट्टाचार्यद्वयी !
बंगालच्या पोलीस खात्यात ‘इन्स्पेक्टर जनरल’च्या हुद्यापर्यंत गेलेले इंग्रज अधिकारी ली वॉर्नर यांच्याकडून प्रेरणा घेऊन तत्कालीन इंग्रज अधिकारी जॉन मोर्लेसाहेबांनी लंडनमधील हिंदी पुढार्यांना हद्दपार केले. भारतमातेच्या एका सुपुत्राला याचा संताप आला; म्हणून त्याने १ फेब्रुवारी १९०९ या दिवशी दुपारी १ वाजता लंडनमधील थेनियन क्लबच्या शेजारी रस्त्यावर ली वॉर्नर यांच्या गालावर आपल्या उजव्या हाताचा पंजा उमटवला. त्या तरुणाचे नाव कुंजविहारी भट्टाचार्य ! या घटनेच्या अनुषंगाने केलेला विचारविमर्श लेखाद्वारे मांडला आहे.
१. ली वॉर्नर यांनी बंगाली तरुणांना इंग्लंडबाहेर हाकलून देण्याचा सल्ला दिल्याने हिंदी तरुण संतप्त !
इंग्रज हे लंडनमध्ये वास्तव्य करणार्या बंगाली तरुणांकडे संशयित म्हणून पहात होते. ली वॉर्नर म्हणजे बंगालच्या पोलीस खात्यात ‘इन्स्पेक्टर जनरल’च्या हुद्यापर्यंत गेलेले एक इंग्रज अधिकारी होते. मोर्ले आणि वॉर्नर यांनी ‘बंगाली तरुणांना इंग्लंडबाहेर हाकलून देण्याचा सल्ला गृहखात्याच्या सचिवाला (सेक्रेटरीला) दिला होता’, अशी माहिती समजली होती. त्यामुळे ली वॉर्नरविषयी हिंदी तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
२. कुंजविहारी भट्टाचार्य या तरुणाचे बेधडक कृत्य !
हिंदी तरुणांच्या वाट्याला जाणे आता सोपे राहिले नाही, हे इंग्रजांना पटवून देण्यासाठी कुंजविहारी भट्टाचार्य या तरुणाने ली वॉर्नर यांच्या गालावर जोरदार तडाखा मारून स्वतःच्या हाताचा पंजा उमटवला होता. ली वॉर्नर हिंदुस्थानात असतांना त्यांनी तेथील संस्थानिकांना भयभीत करून सोडले होते. असा दरारा निर्माण करणार्या ली वॉर्नर यांची शोभा कुंजविहारी भट्टाचार्य या तरुणाने इंग्रजांच्या राजधानीत सूर्य तळपत असतांना काढली.
३. ली वॉर्नर यांनी अपशब्द उच्चारल्याचा परिणाम !
कुंजविहारी भट्टाचार्य याने ली वॉर्नर यांच्या कानशिलात जरी लगावली असली, तरी ते कृत्य करतांना त्याची भूमिका अत्यंत सोज्वळ होती. कुंजविहारी एक आवेदन पत्र घेऊन वॉर्नर यांच्याकडे गेला होता. ‘हेे आवेदन पत्र मोर्लेसाहेबांना द्यावे’, असा आग्रह त्याने वॉर्नर यांच्याकडे केला. वॉर्नर यांनी आवेदन पत्र देणार्या भट्टाचार्य याला झिडकारले. तरीही भट्टाचार्यने त्यांना कळकळीची विनंती केली. त्यामुळे वॉर्नर यांना त्याचा राग आला. दोघांमध्ये वाद झाला. ली वॉर्नर यांनी कुंजविहारीला उद्देशून ‘चल बाजूला हो निगर’, असे अपशब्द उच्चारले. त्यामुळे त्याने संतप्त होऊन वॉर्नर यांचा हात धरून खेचले आणि त्यांच्या थप्पड लगावली.
४. लाज जाऊ नये, यासाठी ली वॉर्नर यांनी प्रकरण दडपले !
गालावर जोरदार तडाखा पडल्यामुळे ली वॉर्नर कोलमडून भूमीवर पडले. पोलिसांनी कुंजविहारी भट्टाचार्य याला त्याच्या कृत्याविषयी खडसावले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली; पण आपली अधिक शोभा होऊ नये; म्हणून वॉर्नर यांनी ते प्रकरण तिथेच दडपून टाकले.
५. वासुदेव भट्टाचार्य यांच्याकडून ली वॉर्नर यांना काठीचा तडाखा !
भट्टाचार्य यांच्याकडून मार खाल्ल्याचे प्रकरण लोकांच्या विस्मृतीत जाते न जाते, तोच वासुदेव भट्टाचार्य आणि ली वॉर्नर यांच्यात वाद निर्माण झाला. वासुदेव भट्टाचार्य हे पूर्वी बंगालमधील ‘संध्या’ आणि ‘युगांतर’ यांसारख्या वृत्तपत्रांच्या संपादक मंडळात होते. कुंजविहारी भट्टाचार्य याचा पराक्रम वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. तो वाचून वासुदेव भट्टाचार्य हे ली वॉर्नरविरोधात संतप्त झाले. एका भारतीय नागरिकाला ‘चल बाजूला हो निगर’ असे उपमर्दकारक शब्द उच्चारल्याने ‘ली वॉर्नर यांनी क्षमा मागितली पाहिजे’, अशा आशयाचे पत्र वासुदेव भट्टाचार्य यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले. ते पत्र त्यांनी स्वतः ली वॉर्नर यांना देण्याचे ठरवले. वासुदेव भट्टाचार्य यांनी ते पत्र ली वॉर्नर यांना रस्त्यातच दिले. पत्रातील लिखाण वाचून त्यांना संताप आला. त्यांनी वासुदेव भट्टाचार्यांना ‘सुवर का बच्चा’ अशी शिवी दिली. त्यामुळे वासुदेव भट्टाचार्य संतापले. त्यांनी वॉर्नर यांना धमकी दिली. वॉर्नर यांनी हातातील छत्रीने वासुदेव भट्टाचार्य यांना टोचण्याचा प्रयत्न केला; पण तितक्यात वासुदेव भट्टाचार्य यांनी हातातील काठी गरगर फिरवून वॉर्नर यांना काठीचा तडाखा दिला.
६. ली वॉर्नर यांना दोन भट्टाचार्यांकडून मार !
इंग्लंडच्या राजधानीतील रस्त्यावर घडलेला हा प्रकार मोर्लेसाहेबांना कळला. स्वतःकडील सत्तेचा उपयोग करून त्यांनी भट्टाचार्यांवर खटला भरण्याची व्यवस्था केली. १० फेब्रुवारी १९०९ या दिवशी बो स्ट्रीट पोलीस न्यायालयात निकाल लागला. वासुदेव भट्टाचार्यांनी ६ मासांपर्यंत सद़्वर्तन ठेवावे, प्रत्येकी दहा पौंडप्रमाणे दोन जणांनी त्यांना जामीन द्यावा किंवा १ मास कारावास भोगावा, अशी शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली. भट्टाचार्यांना जामीन देण्यास मादाम कामा आणि अन्य प्रतिष्ठित मंडळी सिद्ध होती. तरीही त्यांनी कुणाचेही साहाय्य घेतले नाही. त्यांनी १ मास कारावासात जाणे मान्य केले; पण दोन भट्टाचार्यांकडून मिळालेल्या ‘प्रसादा’चा धसका ली वॉर्नर यांनी घेतला.
७. स्वातंत्र्यापूर्वीच्या तरुणांची राष्ट्रनिष्ठा अनुकरणीय !
देश पारतंत्र्यात असला, तरी त्या वेळच्या तरुणांनी स्वाभिमान आणि आत्मसन्मान जपला. इंग्रज अधिकार्यांच्या अरेरावीला ते शरण गेले नाहीत. अन्याय, अत्याचार करणार्या ब्रिटीश सरकारचा, तसेच ब्रिटीश अधिकार्यांचा समाचार घेण्याची शक्ती अन् सामर्थ्य त्या वेळच्या तरुणांमध्ये होते. ब्रिटिशांच्या राजधानीतसुद्धा त्यांनी ब्रिटीश अधिकार्यांना धडा शिकवला. त्यांची राष्ट्रनिष्ठा आणि अन्यायाविरुद्धची चीड ही वंदनीय अन् अनुकरणीय आहे. आपण कुणावरही कधीही अन्याय करायचा नाही; मात्र कुणी आपल्यावर अन्याय केला, तर तो सहन करायचा नाही, हीच खरी सभ्यता आहे. ही सभ्यता कुंजविहारी भट्टाचार्य आणि वासुदेव भट्टाचार्य या दोघांनी पाळली.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२६.६.२०२३)