पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या कर संकलन आणि कर आकारणी विभागाची चांगली कामगिरी !

९० दिवसांत ४४७ कोटी रुपयांचा कर वसूल !

पिंपरी-चिंचवड महापालिका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने दमदार कामगिरी केली असून ९० दिवसांत ५० टक्‍क्‍यांहून अधिक करदात्‍यांकडून ४४७ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. कर भरून शहर विकासात योगदान देणार्‍या नागरिकांचे आयुक्‍त, तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले. शहरात निवासी, बिगर निवासी, औद्योगिक, तसेच मिश्र आणि मोकळ्‍या भूमी अशा ६ लाख २ सहस्र २०३ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. यांपैकी ५० टक्‍के मालमत्ताधारकांनी ४४७ कोटी ३ लाख ६५ सहस्र रुपयांचा कर महापालिकेच्‍या तिजोरीत जमा केला आहे. कर संकलनासाठी महापालिकेने विविध मार्गांचा अवलंबही केला होता. यामध्‍ये जनजागृतीपर उपक्रम, जप्‍ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटिसा, नळ जोडणी बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रांत सूची प्रसिद्ध करणे, यांसह महिला बचत गटांच्‍या माध्‍यमातून देयकांचे घरोघरी वाटपही केले होते. यांसह महत्त्वाच्‍या चौकांत होर्डिंग्‍ज, रिल स्‍पर्धा, सामाजिक माध्‍यमांचा प्रभावी उपयोग करून प्रत्‍येक व्‍यक्‍तीला त्‍याची मालमत्ताकराची रक्‍कम आणि सवलतीची रक्‍कम सांगणारा संदेशही पाठवला होता. या सर्वांमुळे कर वसूल करण्‍यात विभागाला यश मिळाले.

संपादकीय भूमिका

कर वसूल न होण्‍यामध्‍ये करदात्‍यांइतकीच अधिकार्‍यांचीही चूक आहे. कर बुडवणार्‍यांना पाठीशी घालणारे हे तितकेच दोषी आहेत. कर बुडवणार्‍यांवर कठोर कारवाई केल्‍यासच जरब बसून करसंकलन वाढेल.