अपघातग्रस्त बसच्या विदर्भ ट्रॅव्हल्सवर आतापर्यंत अनेक नियमांचे उल्लंघन प्रकरणी दंड
प्रलंबित ठेवलेला दंड घाईघाईने भरला
बुलढाणा – जिल्ह्यातील पिंपळखुटी गावाजवळ अपघातग्रस्त आणि अपघातात २५ जणांचा जीव घेणार्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या संदर्भात काही गोष्टी पुढे येत आहेत. संबंधित बस आस्थापनाने अनेक वेळेला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दंड झाला आहे; मात्र कधीही तो दंड भरलेला नाही. अपघात झाल्यानंतर मात्र अवघ्या काही घंट्यांत सर्व दंड ‘ऑनलाईन’ भरण्यात आले. त्यामुळे परिवहन विभागाचे अधिकारी या बसच्या वारंवार वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी का दुर्लक्ष करत होते ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
५ फेब्रुवारी २०२१ ते १२ जून २०२३ या कालावधीत विदर्भ ट्रॅव्हल्सला पीयूसी नसणे (प्रदूषण नसणारे प्रमाणपत्र), चालकांचे आरोग्य तंदुरुस्त (फिटनेस) प्रमाणपत्र न दाखवणे, स्पीड गव्हर्नर नीट काम करत नसणे, अग्नीशमन सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसणे, आपत्कालीन दरवाजा नीट काम न करणे, वाहतनतळ नसलेल्या ठिकाणी बस उभी करणे, अयोग्य विजेचा वापर करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे, वाहनचालकाने योग्य कपडे न घालणे, बसच्या खिडकीच्या काही काचा तुटलेल्या आहेत, तसेच बस ठरलेल्या ठिकाणी न थांबवता प्रवासावेळी मध्येच थांबवणे अशा कारणांसाठी ४५ सहस्र ४०० रुपयांचा दंड आकारला होता. हा सर्व दंड १ जुलैच्या दुपारी १.१५ वाजल्यापासून ते १.२३ वाजेपर्यंत ‘ऑनलाईन’ भरण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :अनेक मास सहस्रो रुपयांचा दंड न भरल्याविषयी राज्य परिवहन मंडळाने विदर्भ ट्रॅव्हल्सवर आतापर्यंत कारवाई का केली नाही ? यासाठी परिवहन मंडळाच्या संबंधितांवरही कारवाई व्हायला हवी ! |