रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘श्रीराम शाळिग्राम’ च्या प्रतिष्ठापनेपूर्वी पिंडिका सिद्ध करणे आणि तिचे रंगकाम करणे, या सेवांत आलेले अडथळे अन् आलेल्या अनुभूती
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार १४ आणि १५.७.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘श्रीराम शाळिग्राम’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेपूर्वीची सिद्धता करतांना आश्रमातील साधक श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना सेवेत आलेले अडथळे आणि अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सेवेत आलेले अडथळे
१ अ. अकस्मात् अडीच घंटे वीज जाणे : ‘श्रीराम शाळिग्राम’साठी पिंडिका सिद्ध करण्यासाठी मी कारवार येथील शिल्पकार श्री. गजानन नंदा आचारी यांच्याकडे गेलो होतो. पिंडिका बनवायला चालू केल्यावर अकस्मात् वीज गेली आणि ती अडीच घंटे आलीच नाही.
१ आ. पिंडिकेेला गोल आकार देतांना ‘ग्राईंडर’चे पाते तुटले.
१ इ. पिंडिका घेऊन कारवारहून निघतांना मुसळधार पाऊस पडू लागला. त्यामुळे प्रवासात पुष्कळ अडचणी आल्या.
१ ई. पिंडिकेेची स्थापना केल्यावर मूर्तीशाळेतील एक छोटे लोखंडी पटल उचलून ठेवत असतांना पटलाचा खालचा हिस्सा सुटून साधकाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर पडणे आणि अंगठ्याला असह्य वेदना होणे : ‘श्रीराम शाळिग्राम’ची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी १२.७.२०२२ या दिवशी पिंडिकेची स्थापना करण्यात आली. १३.७.२०२२ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ६.३० वाजेपर्यंत ही सेवा पूर्ण झाली. पहाटे मंदिरात पिंडिका बसवली. सकाळी ६.३० ला आश्रमातील मूर्तीशाळेत मी एक छोटे लोखंडी पटल (टेबल) उचलून ठेवत असतांना पटलाचा खालचा भाग सुटून तो माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर पडला. त्यामुळे अंगठ्याला मार लागून सूज आली आणि पुष्कळ वेदना होऊ लागल्या. मला जमिनीवर पाय टेकवता येत नव्हता आणि चालतांना अन् बसल्यावर असह्य वेदना होत होत्या.
२. सेवेतील अडथळे दूर होऊन सेवा पूर्ण होणे
२ अ. सेवेतील अडथळे दूर होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि सद़्गुुरु मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारून घेणे : मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, आपणच माझ्याकडून ही सेवा करून घ्या. कितीही वेदना झाल्या, तरी सेवेमध्ये कोणतेच अडथळे यायला नकोत.’ सद़्गुुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना याविषयी सांगून मी नामजपादी उपाय विचारून घेतले. मी श्री सिद्धीविनायकाला प्रार्थना केली आणि नामजप करत सेवा करू लागलो. तेव्हा आरंभी अधिक तीव्र वेदना होत होत्या. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मी नामजप करत सेवा चालू ठेवली.
२ आ. रंगसेवा होईपर्यंत त्रास न होणे, सेवा पूर्ण झाल्यावर तीव्र वेदना होऊ लागणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘वाईट शक्तींचे मोठे आक्रमण झाल्याने त्रास झाला’, असे सांगणे : दुसर्या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पिंडिकेच्या चौथर्याचे रंगकाम वेळेत पूर्ण झाले. रंगकाम करतांना ‘पायाला अंगठाच नाही’, असे मला जाणवत होते. सेवा पूर्ण होईपर्यंत मला काही त्रास जाणवला नाही. रंगसेवा झाल्यावर मात्र मला तीव्र वेदना होऊ लागल्या.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना मी माझ्या पायावर पटल पडल्याचे सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्यावर वाईट शक्तींचे पुष्कळ मोठे आक्रमण झाले. या सेवेतून पुढे काहीतरी चांगले घडणार आहे; कारण ही सेवा चालू करण्यापूर्वीच अनेक अडथळे आले, तरीही पिंडिकेची स्थापना पूर्ण झाली.’’ सायंकाळी ‘श्रीराम शिळेची’ स्थापना होईपर्यंत कोणतेही औषध न लावता माझ्या अंगठ्याच्या वेदना उणावल्या.
३. अनुभूती
३ अ. ६० घंटे अखंड सेवा करता येणे : पिंडिका बसवण्याच्या दिवसापासून ते स्थापना पूर्ण होईपर्यंतचे अडीच दिवस (६० घंटे) मी एक सेकंदही न झोपता अखंड सेवा केली, तरीही मला कोणताही त्रास झाला नाही.
३ आ. पायात तीव्र वेदना होत असतांनाही आनंद अनुभवणे : माझ्या उजव्या पायात अखंड तीव्र वेदना होत असूनही मला आनंद अनुभवता येत होता. ‘प.पू. गुरुदेवच माझ्याकडून प्रत्येक कृती करून घेत आहेत’, असे जाणवून माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता.
या सर्व अनुभूतींसाठी प.पू. गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘या पामराकडून अशीच सेवा अखंड करून घ्यावी’, हीच शरणागतभावाने प्रार्थना आहेे.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |