गुरुमहिमा !
(श्रीमत् शंकराचार्यविरचित गुर्वष्टकम् ।)
१. मन गुरूंच्या चरणी रमत नसेल, तर सर्व व्यर्थ आहे !
१ अ. व्यावहारिकदृष्ट्या सर्व चांगले असूनही मन गुरूंच्या चरणी नसेल, तर काय लाभ होणार ?
शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं यशश्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् ।
मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ १ ॥
अर्थ : एखाद्याचे शरीर रूपवान असले, पत्नीही सुंदर असली, त्याची सत्कीर्ती चारी दिशांमध्ये पसरली असली आणि त्याच्याकडे मेरु पर्वताएवढे अपार धन असलेे; परंतु त्याचे मन गुरूंच्या श्री चरणी रमत (आसक्त) नसेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध होऊनही त्याला काय लाभ होणार ?
कलत्रं धनं पुत्रपौत्रादिसर्वं गृहो बान्धवाः सर्वमेतद्धि जातम् ।
मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ २ ॥
अर्थ : एखाद्याला सुंदर पत्नी, धन, पुत्र-पौत्र, घर आणि स्वजन आदी प्रारब्धाने सर्व सुलभतेने प्राप्त झाले असेल; परंतु जर त्यांचे मन गुरूंच्या श्री चरणी रमत (आसक्त) नसेल, तर त्याला ही सर्व प्रारब्ध-सुखे मिळून काय लाभ मिळणार ?
१ आ. एखाद्याचा इच्छा आणि वासना यांचा लोभ सुटला आहे; परंतु त्याचे मन गुरूंच्या चरणी रमत नसेल, तर त्याला या अनासक्तीचा काय लाभ होणार ?
अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घ्ये ।
मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ८ ॥
अर्थ : ज्यांचे मन वन किंवा आपल्या घरात, आपले कार्य किंवा शरीर यांत अथवा अमूल्य भांडारात आसक्त होत नसेल; परंतु त्यांचे मन जर गुरूंच्या श्री चरणी रमत (आसक्त) नसेल, तर त्यांना या अनासक्तीने काय लाभ होणार ?
न भोगे न योगे न वा वाजिराजौ न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम् ।
मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ७ ॥
अर्थ : ज्यांचे मन भोग, योग, अश्व, राज्य, स्त्रीसुखोपभोग आणि धनभोग यांमुळे विचलित होत नसेल; परंतु त्यांचे मन जर गुरूंच्या श्री चरणी रमत (आसक्त) नसेल, तर त्यांना या अविचलतेचा काय लाभ होणार ?
१ इ. ज्याला समाजात किंवा विदेशात मान आहे; परंतु त्याचे मन श्री गुरूंच्या चरणी रमत नसेल, तर त्यांना या सद़्भाग्याचा काय लाभ होणार ?
क्षमामण्डले भूपभूपालवृन्दैः सदा सेवितं यस्य पादारविन्दम् ।
मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ५ ॥
अर्थ : ज्या महापुरुषाचे चरणकमल पृथ्वीवरील राजे-महाराजे यांद्वारा नित्य पूजले जात असतील, तसेच सर्वांकडून त्यांची सतत प्रशंसा केली जात असेल; परंतु त्यांचे मन जर श्री गुरूंच्या चरणी रमत (आसक्त) नसेल, तर त्यांना या सद़्भाग्याचा काय लाभ होणार ?
विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः ।
मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ४ ॥
अर्थ : ज्याला विदेशामध्ये सन्मान मिळत आहे, आपल्या देशामध्ये ज्याचे नित्य जयजयकार करून स्वागत केले जात आहे आणि जो सदाचार-पालनालाही अनन्य स्थान देत आहे; परंतु त्याचे मन गुरूंच्या श्री चरणी रमत (आसक्त) नसेल, तर त्यांना या सद़्गुणांचा काय लाभ होणार ?
१ ई. सहा शास्त्रे मुखोद़्गत आणि समाजात मान असूनही मन गुरूंच्या चरणी नसेल, तर सद़्गुणांचा काय लाभ होणार ?
षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यं सुपद्यं करोति ।
मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ३ ॥
अर्थ : वेद आणि वेदांगादी सहा शास्त्रे ज्यांना मुखोद़्गत आहेत, ज्यांच्यामध्ये सुंदर काव्य निर्माण करण्याची प्रतिभा आहे; परंतु त्यांचे मन गुरूंच्या श्री चरणी रमत (आसक्त) नसेल, तर त्यांना या सद़्गुणांचा काय लाभ होणार?
१ उ. गुरूंच्या कृपादृष्टीमुळे संसारातील सर्व सुख-ऐश्वर्य मिळाले; पण मन गुरूंच्या श्री चरणी रमत नसेल, तर ऐश्वर्याचा काय लाभ होणार ?
यशो मे गतं दिक्षु दानप्रतापात् जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् ।
मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ६ ॥
अर्थ : दानी वृत्तीच्या प्रतापाने ज्यांची कीर्ती दशदिशांमध्ये पसरली आहे, अतिशय उदार गुरूंच्या सहज कृपादृष्टीने ज्यांना संसारातील सर्व सुख आणि ऐश्वर्य मिळाले आहे; परंतु त्यांचे मन गुरूंच्या श्री चरणी रमत (आसक्त) नसेल, तर त्यांना या ऐश्वर्याचा काय लाभ होणार ?
१ ऊ. जो गुरु-अष्टकाचे पठण करतो, इतरांना शिकवतो आणि ज्याचे मन गुरुवचनामध्येच आसक्त असते, तो पुण्यवान शरीरधारी ‘इच्छित ध्येय आणि ब्रह्मपद’ सहजतेने प्राप्त करून घेऊ शकतो !
गुरोरष्टकं यः पठेत्पुण्यदेही यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेही ।
लभेद्वाञ्छितार्थं पदं ब्रह्मसंज्ञं गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् ॥ ९ ॥
अर्थ : ‘जो यति, राजा, ब्रह्मचारी आणि गृहस्थ या गुरु-अष्टकाचे स्वतः पठण करतो, इतरांना शिकवतो आणि ज्याचे मन गुरुवचनामध्येच आसक्त असते, तो पुण्यवान शरीरधारी ‘इच्छित ध्येय आणि ब्रह्मपद’ या दोन्ही गोष्टी सहजतेने प्राप्त करून घेऊ शकतो’, हे निश्चित आहे.’
(विविध संकेतस्थळांवरून मिळालेले ज्ञान)
– (सद़्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, देहली (९.६.२०२२)