देशविरोधी कारवाया करणार्या दोघा जिहादी आतंकवाद्यांना उत्तरप्रदेशमध्ये अटक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने देशविरोधी कारवायांच्या प्रकरणी दोघा जिहादी आतंकवाद्यांना अटक केली. सद्दाम शेख आणि रिझवान खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना चौकशीसाठी पथकाच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते. चौकशीत त्यांनी आतंकवादी संघटना अल् कायदा, अंसार गजवातुल, हिजबुल मुजाहिद्दीन आदी आतंकवादी संघटनांपासून प्रेरणा घेतल्याचे मान्य केले आहे. ते भारताला इस्लामी देश बनवण्याच्या उद्देशाने सामाजिक माध्यमांतून मोहीम राबवत होते. ते आतंकवादी संघटनांच्या समर्थनार्थ आक्रमक मजकूर प्रसारित करत होते. यावरूनच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
आतंकवादविरोधी पथकाने सांगितले की, ओसामा बिन लादेन, झाकीर मुसा, रियाज नायकू, नावेद नट, समीर टायगर यांच्यासारखे आतंकवादी त्यांचे आदर्श होते. श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयामुळे सद्दाम अप्रसन्न होता आणि त्याचा तो सूड उगवू इच्छित होता. त्यातून तो आक्रमक मजकूर प्रसारित करत होता. यामागे त्याची ‘मला कुणीतरी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण द्यावे’, अशी इच्छा होती. ज्या मुसलमानांवर अत्याचार झाले आहेत, त्यांचे सैन्य बनवण्याची त्याची इच्छा होती. तो एका भ्रमणभाषमधील प्रणालीच्या (‘अॅप’च्या) माध्यमांतून पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या संपर्कात होता.