दासबोधातील सद़्गुरुस्तवन आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
गुरुस्तवन पुष्पांजली
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
९. विश्वाचे मूळ कारण आणि सर्व विश्वास व्यापून टाकणारे मूळ तत्त्व म्हणजे सद़्गुरु !
‘जय जया जि सद़्गुरुराजा । विश्वंभरा बिश्वबीजा ।
परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥
तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे ।
जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥
– दासबोध, दशक १, समास ४, ओवी ८ आणि ९
अर्थ : हे सद़्गुरुराजा, आपला जयजयकार असो ! आपण सर्व विश्वास व्यापले आहे. आपणच विश्वाचे मूळ कारण आहात आणि आपणच परमपुरुष आहात. त्याचप्रमाणे मोक्ष देणारे आणि दीनांचे बंधूही आपणच आहात. जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो, तशी आपली कृपा झाली की, अनावर अशी मायाही ओसरू लागते.’
९ अ. आपल्या कृपास्पर्शाने साधकांना आत्मज्ञान करून देणारे आणि अवघ्या विश्वाला व्यापणारे ब्रह्मांडगुरु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ! : ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव संपूर्ण विश्वाचे अधिनायक आहेत. त्यांचे अवतारत्व आणि गुरुत्व यांच्या प्रभावळीमुळे अवघे विश्व व्यापून गेले आहे. तेच सर्वांचे निर्माते असलेले साक्षात् परमपुरुष आहेत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या रूपात मोक्षगुरुच या भूतलावर अवतरले आहेत. त्यांच्या आगमनामुळे, त्यांच्या कृपास्पर्शाने साधकांच्या जीवनातील मायारूपी अंधकार ओसरून त्यांना आत्मतत्त्वाचे भान होऊ लागले आहे. त्यांच्या अस्तित्वाने केवळ भूतलाचा नव्हे, तर अवघ्या ब्रह्मांडाचा आणि ब्रह्मांडातील चराचर सृष्टीचा उद्धार होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समस्त ब्रह्मांडातील चर-अचर सृष्टी, तसेच स्थावर-जंगम जीवसृष्टीसहित आम्ही सारे साधक अशा ब्रह्मांड गुरूंचा कृतज्ञतापूर्वक जयजयकार करतो !
‘श्री गुरूंचे स्तुतीगान आणि त्यांची कीर्ती वृद्धींगत करण्यात साधकांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण समर्पित होऊन तीच एक छोटीशी गुरुदक्षिणा व्हावी’, अशी ब्रह्मांडगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या श्री चरणी भक्तीपूर्ण प्रार्थना !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२.७.२०२३)
(क्रमशः)
प्रार्थना : ‘हे सद़्गुरुनाथा, हे दीनानाथा, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, सद़्गुरूंना जाणणे आणि त्यांची महती शब्दांतून मांडणे खरोखरंच कठीण आहे. सद़्गुरूंच्या स्वरूपाचे वर्णन करणे जेथे समर्थ रामदास स्वामींसारख्या उच्च कोटीच्या संतांनाही अशक्य वाटते, तेथे आपले वर्णन करण्यास मी सर्वथा असमर्थ आहे. आपले स्वरूप आणि अवतारी कार्य समजणे अत्यंत कठीण आहे. ‘आपल्या कृपेवाचून आपले स्तवन करणे’, ही माझ्यासाठी अशक्य कोटीतील गोष्ट आहे. गुरुदेवा, आम्हा सगळ्यांवर कृपा करावी आणि आपल्या अवतारी गुरुतत्त्वाचा लाभ करून घेण्याची बुद्धी द्यावी’, अशी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या चरणी आर्त प्रार्थना !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२.७.२०२३) |