गहुंजे (पुणे) येथे क्रिकेटचे मैदान असतांना नव्याने मैदान उभारणी कशासाठी ? – नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस
पिंपरी – गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा घाट का घातला जात आहे ? सल्लागाराच्या नावाखाली ७ कोटी ९६ लाख रुपये आयुक्त कुणाच्या सांगण्यावरून खर्च करत आहेत ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला. (जनतेच्या पैशांचा योग्य विनियोग होत आहे का ? हे प्रशासनातील अन्य अधिकारी पहात आहेत का ? – संपादक) पालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ४०० कोटींचा खर्च गृहीत धरून ‘स्टेडियम’ उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी संमती दिली. त्याअन्वये हे स्टेडियम उभारण्यासाठी हालचालीही चालू केल्या आहेत. स्थानिक पदाधिकारी अंतर्गत आर्थिक तडजोडी करून आणि प्रशासनाला हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप काटे यांनी केला आहे.
स्टेडियमच्या सल्लागारासाठी, तसेच स्टेडियम उभारण्यासाठी होणारी पैशांची उधळपट्टी तात्काळ रहित करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन करेल, अशी चेतावणीही काटे यांनी दिली.