समान नागरी कायद्याला विरोध करण्याचे आवाहन !
पुण्यातील आझम कॅम्पस परिसरात झळकला ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा फलक !
पुणे – येथील आझम कॅम्पस परिसरात ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’कडून फलक लावण्यात आला आहे. त्यामध्ये समान नागरी कायद्याच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, विधि आयोग समान नागरी कायद्याविषयी (युनिफॉर्म सिव्हिल कोड) जनतेचे मत जाणून घ्यायच्या प्रयत्नात आहे. विधी आयोगाने १४ जून २०२३ या दिवशी एक ‘पब्लिक नोटीस’ जारी केली होती. यामध्ये समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे का ? हे नव्याने जाणून घेण्यासाठी विधी आयोगाकडून सार्वजनिक, धार्मिक संस्था, तसेच समाजाच्या विविध स्तरांतील लोकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. येत्या ३० दिवसांत म्हणजेच १३ जुलैपर्यंत नागरिक आणि धार्मिक संघटना यांनी याविषयी प्रतिक्रिया विधी आयोगाला कळवायच्या आहेत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वत:च्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे आणि हे स्वातंत्र्य आपल्या मूलभूत अधिकारांत येते. त्यामुळे कुठलीही संसद यात दुरुस्ती करू शकत नाही आणि केली तरी मुसलमान समाज मानणार नाही. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची प्रतिक्रिया नोंदवावी. अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे.