श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सव यांनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन !
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर), २ जुलै (वार्ता.) – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन आणि श्री गुरुपोर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त ३ जुलै या दिवशी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत नामस्मरण, नामजप आणि श्री गुरुपूजा, सकाळी १० वाजता सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते महानेवैद्य दाखवण्यात येणार आहे.
सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद असणार आहे. दिनांक १ जुलै ते ३ जुलैपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ महाराष्ट्रासह देश-विदेशातील स्वामी भक्तांनी घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे.
समर्थ महाप्रसाद सेवा ! अक्कलकोट शहरातील निराधार, अपंग आणि गरीब-गरजूंना दैनंदिन दोन्ही वेळेचे जेवण डब्यातून पुरवण्याचा स्तुत्य निर्णय ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’ने घेतला असून, त्याप्रमाणे २५० जणांना त्यांच्या पत्त्यावर जेवणाचा डबा प्रतिदिन पोचवण्यात येत आहे. |