फर्मागुडी (गोवा) येथील ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव’ साजरा झाला. त्या वेळी देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता चालू झाला. त्याच्या आधीपासून आणि त्यानंतर वेळेनुसार केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
सकाळी ९.३० – मी एका सेवेनिमित्त सकाळी ९.३० वाजता ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम असलेल्या मैदानात गेलो होतो. तेथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठीचा रथ सजवण्याची सेवा चालू होती. त्यातून वातावरणात दूर अंतरापर्यंत पेटत्या उदबत्तीतून धूर येतांना दिसतो, त्याप्रमाणे पुष्कळ चैतन्य वातावरणात प्रक्षेपित होतांना दिसत होते.
दुपारी ३.५० – मैदानात कार्यक्रमासाठी आलेल्या साधकांची पुष्कळ गर्दी झाली होती. तेव्हा चांगली साधना करणार्या साधकांच्या देहाच्या भोवती पांढर्या किंवा निळ्या रंगांची दैवी आभा दिसत होती.
दुपारी ४.०५ – कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा साधक अन्य साधकांना कार्यक्रमाविषयी काही सूचना देत होता. त्या वेळी मला सूक्ष्मातून पाताळातील असुरांचे उपहासात्मक हास्य ऐकू आले. असुर दैवी कार्यक्रमाला तुच्छ लेखतात. त्यामुळे ते अशा कार्यक्रमाचा उपहास करतात. त्यानंतर मला सूक्ष्मातून एका असुराचे दोन मोठे डोळे दिसले.
दुपारी ४.१० – साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वर्ष २०२१ मध्ये साजर्या झालेल्या जन्मोत्सवाची ध्वनीचित्रचकती प्रोजेक्टरवर दाखवण्यात आली. त्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वेशभूषा भगवान कार्तिकेयाप्रमाणे होती. त्यातून ‘मंडपाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या मैदानात विविध रंगांच्या दैवी वर्तुळांचे प्रक्षेपण होत आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून मला दिसले.
दुपारी ४.५० – मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रथावर आगमन झाले. कार्यक्रमाचा आरंभ सनातन संस्थेच्या पुरोहित-पाठशाळेतील साधक श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला. त्या वेळी शंखनादातून वेटोळ्याच्या आकाराच्या दैवी नादाची निर्मिती झाली. हा नाद सर्व दिशांना दूर अंतरावर पोचला. तेव्हा मैदानाच्या बाहेरील बाजूला सूक्ष्मातून उभ्या असलेल्या वाईट शक्तींना हा नाद सहन न झाल्याने वैतागून ती काही वेळासाठी तेथून निघून गेली.
दुपारी ४.५१ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आरूढ झालेल्या रथाकडे पाहून माझ्या मनाला आनंद जाणवत होता.
दुपारी ४.५२ – मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथफेरीला आरंभ झाला. तेव्हा ते हात जाडून साधकांकडे पहात होते. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून साधकांच्या दिशेने सूक्ष्मातून ‘कृपालहरी’ जातांना दिसल्या. कृपालहरींमध्ये ‘साधकांची साधना आणखी चांगली होण्यासाठीची प्रेरणा, शक्ती आणि आशीर्वाद’ हे होते. ज्या साधकाचा भाव जितका अधिक तितक्या प्रमाणात त्याला त्यांच्या कृपालहरींचा अधिक लाभ होत होता.
दुपारी ४.५५ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथासमोर काही क्षण सूक्ष्मातून पुष्कळ उंच असलेला आणि पांढर्या रंगाचे वस्त्र धारण केलेला एक देव उभा दिसला. त्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे पाहून दोन्ही हात जोडून नमस्कार केला. या देवाचे नाव मला ओळखता आले नाही.
दुपारी ४.५६ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हृदयातून सूक्ष्मातून ‘ॐ’काराची निर्मिती झाली. त्याचा रंग पांढरा होता. त्यातून निघणारी ऊर्जा वातावरणात पसरली.
दुपारी ४.५७ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रथात बसले असतांना मला सूक्ष्मातून आकाशात विराट हनुमानाचे दर्शन झाले. हनुमानाचे एवढे मोठे रूप मी प्रथमच पाहिले. त्या वेळी हनुमान दोन्ही हात जोडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन घेतांना दिसला आणि त्यानंतर काही क्षणांत तो अदृश्य झाला.
दुपारी ४.५८ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देहातून वातावरणात चैतन्याचे मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण होत होते. हे सहन न झाल्याने कार्यक्रमापासून दूर अंतरावर असलेल्या सूक्ष्मातील एका असुराने दोन्ही हातांचे पंजे काहीतरी ओरबाडतांना ताणतात तसे पंजे ताणले आणि तो मोठ्याने ओरडला. त्या पंजांना लांब नखे होती.
दुपारी ४.५९ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मैदानातील सर्व साधकांकडे पहात होते. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून साधकांच्या दिशेने त्यांच्या भावानुसार पांढर्या, निळ्या आणि लाल रंगांच्या दैवी लहरींचे प्रक्षेपण होत होते.
सायंकाळी ५.०२ – साधकांना दर्शन देण्यासाठी मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथाची फेरी चालू होती. तेव्हा त्यांच्या हृदयातून एक लाल रंगाचा दैवी गोळा एका साधकाच्या दिशेने वेगाने गेला. ‘त्यातून त्या साधकाचा आध्यात्मिक त्रास परात्पर गुरु डॉक्टरांनी न्यून केला’, असे मला जाणवले.
सायंकाळी ५.०५ – रथाच्या फेरीत अनेक साधक सहभागी होते आणि ते देवाच्या स्मरणात राहून नृत्य करत होते. हे पाहून माझा भाव जागृत झाला.
सायंकाळी ५.१० – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांकडे प्रेमाने पहात होते. तेव्हा त्यांचा चेहरा न दिसता त्या जागी गुलाबी दैवी प्रकाश दिसत होता. त्यातून गुलाबी रंगाच्या दैवी लहरी साधकांच्या दिशेने प्रक्षेपित होत होत्या.
सायंकाळी ६.२५ – कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार्या साधकाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त व्यक्त केलेल्या मनोगताचे वाचन केले. त्या वेळी पाताळातील सूक्ष्मातील असुर ढोल वाजवून नाद करत उपहास करत होते.
सायंकाळी ६.३० – ‘महर्षि अधात्म विश्वविद्यालयात’ नृत्याद्वारे साधना करणार्या साधिकांनी ‘अच्युतम् केशवम् ’, या गीतावर नृत्य केले. त्या वेळी त्या सर्व साधिकांच्या भोवती गोल आकारात पांढर्या आणि निळ्या रंगांच्या दैवी लहरी निर्माण झाल्या होत्या. त्या वेळी ‘साधिकांनी नृत्य भावपूर्ण केल्याचा तो परिणाम होता’, असे मला जाणवले.
सायंकाळी ६.४० – आकाशात सूक्ष्मातून पांढरे वस्त्र धारण केलेले तीन देव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हात जोडून नमस्कार करत होते. त्या वेळी सूक्ष्मातून एक स्त्री आकाशात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आनंदाने नृत्य करतांना दिसली.
सायंकाळी ६.४५ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त साधिकांनी फेर धरून नृत्य सादर केले. त्याचा पाताळातील सूक्ष्मातील असुरांनी फेर धरून नृत्य करत उपहास केला. या फेर्याच्या मध्यभागी शेकोटीप्रमाणे आग पेटलेली होती.
सायंकाळी ६.४६ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सात्त्विक हिंदूंसाठी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करायची आहे. त्याला विरोध म्हणून सप्तपाताळांतील असुर सूक्ष्मातून ‘व्हिक्ट्री’(विजय), ‘व्हिक्ट्री’(विजय), असे ओरडत होते. यातून असुर ‘धर्माचा नाही, तर अधर्माचा म्हणजेच आमचाच विजय होणार आहे’, असे मत व्यक्त करत होते.
रात्री ७.४० – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मैदानाच्या भोवती पांढर्या रंगाचे ईश्वरी कवच निर्माण झाले होते. त्यामुळे सूक्ष्मातील असुरांना कार्यक्रमात कुठलाही अडथळा आणता आला नाही.
रात्री ७.५० – ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ भूमीवर नसून हवेत आहे’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसत होते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०२३)
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवा’चे सूक्ष्म परीक्षण जाणून घेण्याची अनेक साधकांना उत्सुकता असणे
‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा झाला. त्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला मिळाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर लगेच आणि त्याच्या दुसर्या दिवशी अनेक साधकांनी ‘या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण लवकर लिहून दे’, असे मला सांगितले. तेव्हा लक्षात आले की, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचा सूक्ष्मातून परिणाम काय झाला ?’, हे जाणून घेण्याची अनेक साधकांना उत्सुकता होती; म्हणून ते मला तसे सांगत आहेत.’
– श्री. राम होनप (१७.५.२०२३)
|