जळगाव येथे वाहनावर झाड कोसळल्याने पोलीस अधिकार्यासह चालक ठार !
जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल कासोदा येथे एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या वाहनावर झाड कोसळले. या दुर्घटनेत नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यासह चालक अजय चौधरी यांचे निधन झाले आहे. ३० जून या दिवशी हा प्रकार घडला. दातीर यांच्या पश्चात पत्नी, ८ मासांचा मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
या दुर्घटनेत चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी आणि भरत जेथवे हे ३ पोलीस कर्मचारी गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. स्थानिकांच्या साहाय्याने घायाळ पोलिसांना बाहेर काढण्यात आले.