नंदुरबार येथे वादळाने जिल्हा परिषदेच्या ४४ शाळांची हानी !
|
नंदुरबार – जिल्ह्यात झालेल्या वादळाने जिल्हा परिषदेच्या ४४ शाळांची हानी झाली आहे. वादळामुळे या शाळांवरील पत्रे उडून गेले आहेत. वादळाच्या दुसर्या दिवशी तातडीने पंचनामे झाले; मात्र त्याला १ मास होऊनही शिक्षण विभागाकडून या शाळांची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे ऐन पावसात विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.
शाळांच्या मुख्याध्यापकांनी दुरवस्थेविषयी वरिष्ठ स्तरावर अहवालही पाठवले; मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे या शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसे नाहीत.
(सरकार अनेक स्तरांवर विविध योजना राबवत असतांना जिल्हा परिषदेची अशी स्थिती असणे दुर्दैवी ! – संपादक) पावसाचे पाणी व्हरांड्यात येत असल्याने विद्यार्थ्यांसमवेत शालेय साहित्यही भिजण्याची शक्यता आहे. याविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि शैक्षणिक हानी पाहून अनेक ग्रामपंचायतींनी शाळांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्या संबंधितांवर कारवाई करायला हवी ! |