भ्रष्टाचाराचा आरोप करत ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा !

रस्त्यांच्या कामाची किंमत वाढवून दाखवल्याचा आरोप

मुंबई – महागनरपालिकेच्या कारभारामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमापासून प्रारंभ झालेल्या या मोर्च्यात ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्च्यामध्ये विद्यमान सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोर्च्यामध्ये आमदार अनिल परब, सुनील प्रभु आदी आमदारही सहभागी झाले होते. मोर्चा महानगरपालिकेच्या येथे आल्यावर आदित्य ठाकरे यांचे भाषण झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला.

आदित्य ठाकरे मोर्च्याला संबोधित करतांना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते चकाचक करू असे सांगितले; मात्र या कामाचा ठेका केवळ त्यांच्या मित्रांना दिला जातो. कामाचे ५ भाग करून ५ मित्रांना वाटून देण्यात आले. यातून ४० टक्के कमिशन घेतले जाते. मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाला आहे. ५ सहस्र कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे ६ सहस्र ८० कोटी रुपये इतकी वाढवून दाखवण्यात आली. ते पुढे म्हणाले की, खोके शासनाच्या चोरीची धारिका माझ्याकडे आहे. अलिबाबा आणि चाळीस चोरांनी मुंबईला लुटले. रस्त्यांची कामे त्यांच्या मित्रांना दिली जात आहेत. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे अन्वेषण करण्यात यावे, यासाठी आम्ही राज्यपालांकडे मागणी केली आहे. ज्या दिवशी आमचे सरकार येईल, त्या दिवशी तुमची जागा दाखवू. घोटाळे करणार्‍यांना अटक केली जाईल. मोर्च्यातील गर्दी हे भगवे वादळ बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. आम्ही २० वर्षे केलेले काम दाबले जात आहे.