दासबोधातील सद्गुरुस्तवन आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
गुरुस्तवन पुष्पांजली
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
८. पृथ्वी आणि सद्गुरु
‘धीरपणें उपमूं जगती ।
तरी हेहि खचेल कल्पांतीं ।
म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं ।
हीण वसुंधरा ।। – दासबोध, दशक १, समास ४, ओवी २०
अर्थ : ‘धैर्यशील’ म्हणून गुरूंना पृथ्वीची उपमा द्यावी, तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल. त्यामुळे तिची उपमाही अयोग्य ठरते.’
८ अ. पृथ्वीवरील अधर्माचा भार नष्ट करून पृथ्वीला आनंद देणारे आणि युगानुयुगे भक्तांचा भार वहाणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
‘कोटी कोटी जीवसृष्टीचा भार युगानुयुगे सहन करणारी वसुंधरा ‘धैर्यशीलता’ या गुणाचे मूर्तीमंत प्रतीक आहे. जेव्हा सर्व व्यवहार धर्मवत् चालत असतात, त्या वेळी तिच्यासाठी ते सहनीय असतात; परंतु अधर्माचा भार वाढल्यावर तिला ते असहनीय होतात. त्या वेळी पृथ्वी जगन्नियंत्या नारायणाला शरण जाते आणि तो ‘नारायण अवतार’ धारण करून धरतीवरील अधिकचा भार नष्ट करून तिला आनंद देतो. याच नारायणाचे अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हा भूभार (भूतलावरील अधर्माचा भार) नष्ट करण्यासाठी पृथ्वीवर अवतरले आहेत. अनंत कोटी जीवसृष्टीसमवेत पुनःपुन्हा जन्म-मरण लीला करूनही परब्रह्मस्वरूप, साक्षात् नारायणावतारी गुरुदेव कधी थकत नाहीत.
पृथ्वीला धारण करणार्या शेषाप्रमाणे भक्तरूपी साधकांचा सर्व भार श्री गुरूंनी स्वतः उचलला आहे. असे हे नारायणस्वरूप श्री गुरुच आपले दुःखहर्ते, पालनकर्ते अन् रक्षणकर्ते आहेत, याची प्रचीती घेऊया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
(१.७.२०२३)