नाशिक येथे सव्वा एकरवर साकारत आहे देशातील दुसरे कामाख्या देवी मंदिर !
५५ कोटींचा व्यय, ऑगस्ट मासात मंदिर खुले होणार !
नाशिक – आसाम राज्यातील गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे देशातील दुसरे मंदिर नाशिक जिल्ह्यातील धारणगाव खडक (तालुका निफाड) येथे उभारले जात आहे. ऑगस्ट मासात ते भाविकांसाठी खुले होईल. सव्वा एकरवरील या मंदिराला १११ खांब असून २१ कळसांपैकी मुख्य ३ सोन्याचे आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील २५० कारागीर या मंदिराच्या उभारणीसाठी मेहनत घेत आहेत. त्यासाठी ५५ कोटी व्यय येईल. कामाख्या देवीचे मुख्य मंदिर गुवाहाटी येथे आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णु यांनी सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे ५१ भाग केले. ते जेथे पडले ते ठिकाण शक्तिपीठ रूपाने प्रसिद्ध झाले. मंदिरावरील ३ सोन्याच्या कळसांपैकी पहिल्या कळसाखाली सिद्ध कामाख्या देवीचे मंदिर असून खांबाच्या चहूबाजूने देव-देविकांच्या मूर्तींच्या प्रतीकृती आहेत. मुख्य कळसावर बावनबीर देवतांच्या मूर्तींच्या प्रतीकृती असतील. आतील बाजूने छत आणि भिंती यांना रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी सजवण्यात येईल.
मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी विविध प्रांतातील साधू-संत आणि महंत यांची उपस्थिती असेल. हा कार्यक्रम ११ दिवसांचा असून परराज्यांतून आणि परगावाहून येणार्या भाविकांच्या निवासाची आणि महाप्रसादाची सुविधा ट्रस्ट, बडेबाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्टच्या वतीने करण्यात येईल.
अशी मंदिराची रचना… श्री. गणेश महाराज जगताप यांना सती देवीने दिलेल्या दृष्टांतानंतर हे मंदिर उभारले जात आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर पूर्वेला भव्य श्रीगणेश मंदिर, पश्चिमेला श्री शिवपार्वती मंदिर, तर उत्तरेला धन कुबेर, धनलक्ष्मी आणि धनदीप या देवतांची मंदिरे, तर आग्नेयेला भव्य सप्तशती चंडी हवन आहे. |