उंचगाव येथील हनुमान वसाहत आणि परिसरातील उच्च दाबाची ३३ सहस्र के.व्ही. क्षमतेची वाहिनी काढून टाकावी !
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महावितरण समोर निदर्शने
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर ) – उंचगाव येथील हनुमान वसाहत, हिरा वसाहत, ब्रह्मनाथ वसाहत, शाहू मिल वसाहत आणि परिसरातून ३३ सहस्र के.व्ही. क्षमतेची वाहिनी सुमारे दीड किलोमीटर लांबपर्यंत गेली आहे. हा सर्व परिसर रहिवासी असून यापूर्वी या वाहिनीला स्पर्श होऊन २ महिलांचा मृत्यू झाला आहे. तरी या वाहिनीमुळे अनेक कुटुंबांच्या जिवितास धोका होत असल्याने ही वाहिनी येथून काढून टाकावी अथवा भूमीतून करण्यात यावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महावितरण समोर निदर्शने करण्यात आली. यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास शिर्के आणि साहाय्यक अभियंता निवास गावडे यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उंचगाव गावप्रमुख श्री. दीपक रेडेकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, फेरीवाला संघटनेचे श्री. कैलास जाधव, युवासेनेचे श्री. सचिन नागटीळक, सर्वश्री अजित चव्हाण, राहुल गट्टे, विठ्ठल फराकटे, सोहम परांजपे, निखिल खिस्ते, विनायक नाईक यांसह अन्य उपस्थित होते.