वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यापूर्वी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सोहळा पहातांना आलेल्या अनुभूती
१. गुरुपौर्णिमा सोहळ्यापूर्वी
१ अ. गुरुपौर्णिमेच्या ३ – ४ दिवस आधीपासूनच ‘या वेळची गुरुपौर्णिमा वेगळी असणार’, असा विचार येणे आणि सेवा आढाव्याच्या वेळी गुरुपादुका पूजनाचा भावप्रयोग घेणे अन् प्रत्यक्षातही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरणांच्या पूजनाचा सोहळा पहायला मिळणे : ‘गुरुपौर्णिमेच्या ३ – ४ दिवस आधीपासूनच माझ्या मनात ‘या वेळची गुरुपौर्णिमा वेगळी असेल’, असा विचार आला. या वेळी ‘गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) चरणांचे पूजन असेल’, असे मला वाटले. तेव्हा माझा भाव जागृत झाला. गुरुपौर्णिमेच्या ४ – ५ दिवस आधी सेवा आढाव्यात सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) हिने भाववृद्धीसाठी प्रयोग घेण्याविषयी सांगितल्यावर आपोआपच माझ्याकडून गुरुपादुका पूजनाचा प्रयोग घेतला गेला. प्रत्यक्षात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरणांच्या पूजनाचा सोहळा पहायला मिळाला. तेव्हा पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ आ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे स्वप्नात दिसले, ‘आज रथोत्सव दाखवतील.’ स्वप्नात ज्या गोष्टी दिसल्या, त्या प्रत्यक्षात त्या दिवशी घडल्या.
२. ध्वनीचित्रफीत पहातांना आलेल्या अनुभूती
अ. २२.५.२०२२ या दिवशी झालेल्या रथोत्सवामध्ये आम्ही नृत्य करणार्या साधिका सहभागी होतो. त्यामुळे आम्हाला बर्याच गोष्टी पहायला मिळाल्या नव्हत्या; परंतु ध्वनीचित्रफीत पहातांना आम्हाला सर्व पहायला मिळाले. ‘परत एकदा तो दिवस आम्ही जगत आहोत’, असे मला वाटले आणि अखंड भावजागृती होत होती.
आ. भावजागृतीसाठी वेगळे काही प्रयत्न करावे लागलेच नाहीत. गुरुमाऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मनोहारी रूप पाहून आपोआप भाव जागृत होत होता.
इ. रथोत्सवाच्या वेळी वाटेत मार्गावर उभे असलेल्या सर्व भक्तांना पाहून तिन्ही गुरूंची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची) भावजागृती होत होती.
ई. हे पहातांना ‘मी सर्व दृष्टींनी किती अल्प आहे, तरी गुरूंचे आपल्यावर किती निरपेक्ष प्रेम आहे’, हे मला जाणवले.
उ. तिन्ही गुरूंना ‘सर्व साधकांना पाहून आनंद मिळत असून त्यांची भावजागृती होत आहे’, हे पाहून माझेे प्रयत्न किती न्यून होतात आणि ‘गुरूंसाठी आपण काय करू आणि किती करू !’, अशी स्थिती व्हायला हवी’, असे मला प्रकर्षाने जाणवले. त्या वेळी मला अपराधी वाटले.
३. गुरुपूजन चालू झाल्यावर
३ अ. ‘कोणत्याही परिस्थितीत केवळ ‘गुरूंचेच चरण’ हेच ध्येय असायला हवे’, असे वाटणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या प.पू. डॉक्टरांच्या समोर उभ्या होत्या; पण त्यांची दृष्टी गुरुदेवांच्या चरणांवरच स्थिरावली होती. तेव्हा ‘कोणत्याही परिस्थितीत केवळ आणि केवळ ‘गुरूंचेच चरण’ हेच माझे ध्येय असायला हवे’, असे मला वाटले.
३ आ. रथोत्सव सोहळ्याचे क्षण आठवल्यावर भावजागृती होणे : ‘न भूतो न भविष्यति ।’, असा हा सोहळा पहायला मिळाल्याने पुष्कळ वेळ भावावस्थेत रहाता आले. सोहळ्यानंतर ४ घंटे सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मला आठवण येत होती. रथोत्सव सोहळ्याचे क्षण आठवल्यावर भावजागृती होत होती.
३ इ. मंत्रजप झाल्यानंतर अधिक उत्साह वाटणे आणि ‘काही वेळ अस्तित्वच नाही’, असे वाटणे : पुष्पार्चनेच्या वेळी मंत्रजप करतांना काही वेळाने माझे डोळे आपोआप बंद झाले आणि माझे मन मंत्रजपावर केंद्रित झाले. थोडा वेळ वाटले की, ‘मला झोप लागत आहे कि काय ?’ तो मंत्रजपाचा वेळ कसा निघून गेला, ते मला कळलेच नाही. मला अधिक उत्साह वाटत होता. ‘काही वेळ माझे अस्तित्वच नाही’, असे मला वाटत होते.
‘अनेक जन्म पुण्य केल्यावर असे गुरु लाभतात’, असे म्हणतात; पण काही न करता केवळ गुरूंच्या कृपेमुळेच मला हा सोहळा पहायला मिळाला. त्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. हा सोहळा मला पहाण्याची संधी दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– कु. मयुरी आगावणे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |