सत्सेवेतून आनंद अशा प्रकारे मिळवा !
३ जुलै २०२३ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…
‘साधना ही आनंद मिळवण्यासाठी करायची असते. साधनेतील ‘सत्सेवा’, म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या उद्देशाने केलेली कृती. त्यामुळे सत्सेवेतूनही आनंद मिळायला हवा; पण ‘सत्सेवा आपल्याला जमेल का ?’, असा विचार करून किंवा ‘त्यामध्ये आपल्याकडून चुका होतील’, या भीतीने काही साधक सत्सेवेतून आनंद मिळवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ‘सत्सेवेतून आनंद कसा मिळवायचा ?’, याची काही उदाहरणे येथे देत आहे.
१. सत्सेवा करतांना मधे मधे ‘आपला नामजप चालू आहे ना ?’, हे पहावे. नामजपामुळे आपले मन स्थिर रहायला साहाय्य होते. तसेच नामजपामुळे मन ईश्वरचरणी लीन होते. ईश्वरचरणी किंवा गुरुचरणी राहिल्यावर आनंद मिळतोच.
२. मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे किंवा धर्मपालन होईल अशा रितीने सत्सेवा केल्याने आज्ञापालनाचा आनंद मिळतो.
३. सत्सेवा करतांना मन आणि बुद्धी पूर्णपणे त्या सेवेमध्ये लावावी. यामुळे अंतर्मुखता साध्य होते. मनात अनावश्यक विचार न आल्याने आणि पूर्ण एकाग्रतेने सेवा होत असल्याने त्यातून आनंद मिळतो.
४. सत्सेवा करतांना काही शंका किंवा अडथळा आल्यास लगेच त्याचे निरसन किंवा निराकरण करून घ्यावे. त्यामुळे सत्सेवा सहज झाल्याने त्यातून आनंद मिळतो.
५. सत्सेवा करतांना कुणी एखादी चूक दाखवून दिल्यास ती सुधारल्याने सत्सेवा योग्य मार्गाने झाल्याचा आनंद मिळतो. चूक दाखवणार्याप्रती कृतज्ञता वाटूनही आनंद मिळतो.
६. सत्सेवा करतांना झालेल्या आपल्या चुकीतून शिकल्यासही आनंद मिळतो.
७. सत्सेवा करतांना काहीतरी शिकायला मिळाल्यासही आनंद मिळतो. यासाठी जिज्ञासा नेहमी जागृत ठेवावी.
८. सत्सेवा करतांना जिज्ञासा जागृत ठेवल्यास सेवेतील बारकावे किंवा सेवेची एखादी नवीन पद्धत देव सुचवतो. त्यातूनही आनंद मिळतो.
९. देवाने नवीन काही सुचवल्यास ते आपल्या मार्गदर्शकांना सांगावे आणि त्यांनी देवाने सुचवल्याप्रमाणे करण्यास होकार दिल्यास तसे करावे. यामुळे मनोलय आणि अहंलय होत असल्याचा आनंद अनुभवता येतो.
१०. सत्सेवा पूर्ण झाल्यावर तिचा आढावा घ्यावा. त्यातून एखादी चूक लक्षात आल्यास ती सुधारता येते. तेव्हाही आनंद मिळतो.
११. आपण केलेली सत्सेवा ‘आपले मार्गदर्शक हे आपले गुरुच आहेत’, हा भाव ठेवून त्यांच्या चरणी अर्पण करावी. त्यामुळे सेवा आपण आपल्या परीने परिपूर्ण केल्याचा आनंद मिळतो. असे असूनही मार्गदर्शकांनी चुका दाखवून दिल्यास ‘त्यांनी आपल्याला आणखी परिपूर्णतेकडे जाण्यास साहाय्य केले’, या विचारानेही आनंद मिळतो.
अशा तर्हेने सत्सेवेतील प्रत्येक टप्प्याला आनंद मिळवता येतो. साधकाच्या जीवनातील प्रत्येक कृती ही सत्सेवाच असावी. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘अष्टांगसाधना’ प्रत्येक कृतीतून होऊ शकते आणि आध्यात्मिक उन्नती सहजतेने होते !’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.६.२०२३)