मणीपूरमधील हिंसाचार आणि उपाययोजना !
रशियातील ‘वॅगनर गटा’च्या बंडामुळे युक्रेनला लाभ !‘वॅगनर गटा’ने रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात जे बंड केले होते, ते निष्फळ झाले आहे. याविषयी कुण्याच्याही मनात शंका नाही. सध्या त्यांनी बेलारूसमध्ये पलायन केले आहे. तेथे जाऊन ‘वॅगनर गटा’चे प्रमुख म्हणाले, ‘‘आमचे हे बंड सरकारच्या विरोधात नव्हते. आम्हाला केवळ पुतिन यांना सांगायचे होते की, रशियाचे सैन्य अजिबात लढाई करत नाही. ते केवळ ४ वर्षांसाठी सैन्यात येतात आणि त्यांची लढायची अजिबात इच्छा नाही. याखेरीज रशियाचे जनरल हे खोटे बोलत आहेत की, त्यांनी युक्रेनचे आक्रमण परतवून लावले वगैरे; पण ते अजिबात सत्य नाही. ही सर्व फसवाफसवी चालली आहे. तेथे केवळ वॅगनर गटाचे भाडोत्री सैनिक लढाई करत आहेत, हेच आम्हाला सांगायचे होते.’’ येथे महत्त्वाचे असे की, यापूर्वी पुतिन यांच्या विरोधात लढायचे धाडस कुणीही दाखवले नव्हते. ते धाडस ‘वॅगनर गटा’ने केले आहे. पुतिन यांच्या विरोधातही कारवाई केली जाऊ शकते, याचा त्यांना मोठा धक्का बसला आहे. आता हे बंड शमले आहे; पर एवढे मात्र नक्की की, ‘वॅगनर गटा’ने युक्रेन लढाईत भाग घेतला नाही, तर केवळ रशियायी सैन्याची युक्रेनवर आक्रमण करण्याची क्षमता फारच अल्प राहील. त्यामुळे युक्रेनच्या सैन्याला या युद्धात एक मोठा लाभ होणार आहे. हे या बंडाचे सर्वांत मोठे महत्त्वाचे सूत्र आहे.’ – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे. |
१. मणीपूरमधील हिंसाचार थांबवण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी
मणीपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहे. तेथे मैतेई आणि कुकी या जमातीचे लोक एकमेकांवर आक्रमण करत आहेत, घरे जाळण्यासह रस्ते बंद केले जात आहेत आणि निवृत्त सैन्याधिकार्यांवरही आक्रमणे केली जात आहेत. मणीपूरमधील परिस्थिती सीरिया, लिबिया किंवा अफगाणिस्तान यांच्यासारखी झालेली आहे. याविषयी भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल एल्.एन्. सिंह यांनी एक ‘ट्वीट’ केले आहे, ‘आम्हाला वाचवा, अशी परिस्थिती आम्ही उभ्या आयुष्यात कधीही पाहिली नव्हती.’ ते मणीपुरी अधिकारी असून इंफाळमध्ये रहातात. त्यांनी भारतीय सैन्याच्या ‘इंटेलीजन्स’ विभागामध्ये ४० वर्षे काम केले आहे. मणीपुरी लोक मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य, आसाम रायफल्स आणि अर्धसैनिक दले यांमध्ये आहेत. असे असतांनाही तेथील परिस्थिती आटोक्यात येण्यास वेळ लागत आहे.
सध्या दोन्ही गट हिंसाचार थांबवण्यास सिद्ध नाहीत. त्यांच्यात प्रचंड द्वेष भिनला आहे. मणीपुरी जनता डोंगराळ भागात रहात असल्याने अतिशय बलवान आहे; पण ते त्यांचे कौशल्य एकमेकांना मारण्यात घालवत आहेत. असे म्हटले जाते की, तेथील हिंसाचार थांबवण्यात मणीपूर पोलीस आणि अर्धसैनिक दले पूर्णपणे कुचकामी ठरलेली आहेत. तेथे केवळ आसाम रायफल्स हे निमलष्करी दल आणि दुसरे भारतीय सैन्य या दोनच फौजा काम करत आहेत. तेथे मणीपूर पोलीस आणि मणीपूर रायफल या राज्य राखीव पोलीस दलांनी त्यांच्याकडे असलेली ४ ते ५ सहस्र शस्त्रे न लढता अराजकीय तत्त्वांना दिली. त्यामुळे जे मैतेई आहेत, ते मैतेईच्या बाजूने आणि जे कुकी आहेत, ते कुकींच्या बाजूने लढत आहेत. अनेक पोलीस त्यांच्या जातीजमातींच्या समूहांसमवेत हिंसाचार करतांना पकडले गेले आहेत. मणीपूरचे पोलीस नेतृत्व नियंत्रण कक्षाबाहेर जायला सिद्ध नाहीत. त्यामुळे मणीपुरी जनतेचा पोलिसांवर अजिबात विश्वास राहिला नाही.
२. आसाम रायफल्स आणि भारतीय सैन्य यांना ४० सहस्रांहून अधिक नागरिकांना हिंसाचारापासून वाचवण्यात यश
सध्या चालू असलेल्या हिंसाचारामध्ये युवकांसह अनेक महिलाही सहभागी आहेत. महिला गट आणि संघटना यांनी आसाम रायफल्सच्या तळांना अनेक ठिकाणी वेढा घातला आहे. त्यामुळे आसाम रायफल्सच्या सैनिकांना त्यांच्या शिबिरांच्या बाहेर येणे कठीण होते. काही ठिकाणी आसाम रायफल्सला हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अन्नपुरवठा करण्यात आलेला आहे. अशा कठीण परिस्थितीत आसाम रायफल्स आणि भारतीय सैन्य दिवसरात्र काम करून त्यांनी ४० सहस्रांहून अधिक नागरिकांना हिंसाचारापासून वाचवले आहे. तसेच हिंसाचार करणार्यांना पकडत आहेत.
३. हिंसाचारामध्ये बांगलादेश आणि म्यानमार येथील घुसखोर, तसेच मिझो यांचा सहभाग
मणीपूरमध्ये झालेल्या शस्त्रसंधी करारामुळे शरणागती पत्करलेल्या अनेक बंडखोर गटांना त्यांच्या शस्त्रांसह शिबिरामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यावर ‘शस्त्रसंधी देखरेख गटा’चे लक्ष असते. तेथून ५ ते ६ सहस्र शस्त्रे गायब झाली असून फारच अल्प शस्त्र परत आली आहेत, असे म्हटले जाते. यासमवेतच हिंसाचाराची आग वाढवण्यासाठी म्यानमारमधून शस्त्रे आणि दारूगोळा येत आहे. या अराजकी तत्त्वांमध्ये बांगलादेशी घुसखोर, म्यानमारमधील घुसखोर आणि मिझो हेही सहभागी झाले आहेत. म्यानमारच्या सरकारने त्यांच्या लोकांना ‘या हिंसाचारात भाग घेऊ नका’, असे सांगितले आहे.
४. मणीपूरमध्ये सुरक्षादलांची नेमकी परिस्थिती
सध्या मणीपूरमध्ये अनेक सुरक्षादले आहेत. ४ मे नंतर भारतीय सैन्याच्या २ डिव्हिजन्स आणि आसाम रायफल्स मणीपूरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. आसाम रायफल्स हे एक अर्धसैनिक दल असून त्याचे अधिकारी भारतीय सैन्यामधील असतात. त्यामुळे या दोन दलांमध्ये चांगला समन्वय असतो. आज तेथे सैन्याचे आणि आसाम रायफल्सचे अनेक सैनिक तैनात आहेत. मणीपुरी जनतेचा केवळ भारतीय सैन्यावरच विश्वास आहे; पण त्यांना कारवाई करतांना अनेक अडचणी आहेत. हा डोंगराळ भाग आहे. काही गावे सोडली, तर ५० ते १०० घरे असतात. ते रस्त्यापासून लांब रहातात. त्यामुळे शांतता निर्माण करायची असेल, तर प्रत्येक खेड्यामध्ये सैन्याची एक तुकडी ठेवायला पाहिजे. थोडक्यात आपले सैन्य अल्प पडत आहेत.
५. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना
अ. डोंगराळ भागांमध्ये लोक एका मोठ्या गावात रहात नाहीत. ते विविध वस्त्यांमध्ये रहातात. तेथे ५० ते १०० घरे एवढीच असतात. लांब पसरलेल्या डोंगराच्या विविध भागांमध्ये रहाणार्या जनतेला १४८ कॉलम (८० ते १०० सैनिक हे २ किंवा ३ अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली एका ‘कॉलम’मध्ये काम करतात.) सैन्य पुरेसे नाही. त्यांची संख्या दुप्पट करावी लागेल.
आ. मणीपूरचे पोलीस नेतृत्व त्यांच्या कामांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे मणीपूर जनता प्रत्येक गाव किंवा वस्ती त्यांच्याजवळ सैन्याला तैनात करण्याची मागणी करत आहे. काश्मीरमध्ये सैन्य शोध मोहिमेला जाते, तेव्हा त्यांच्या समवेत कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी असते. त्याप्रमाणे मणीपूरमध्ये करावे.
इ. १९८० च्या दशकामध्ये मिझोराममध्ये हिंसाचार वाढला होता. तेव्हा सैन्याचे अधिकारी जनरल सगत सिंग यांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती. या वेळीही सैन्याच्या दिमापूर येथील ३ कोरच्या नेतृत्वाखाली सगळ्या सुरक्षादलांना आणले जावे आणि त्यांचा वापर कसा केला पाहिजे, हे या ३ कोरने ठरवावे.
ई. मणीपूरमध्ये सैन्य वाढवून म्यानमार सीमा पूर्णपणे बंद करावी लागेल. त्यामुळे तेथे नवीन शस्त्रे आणि दारूगोळा येणार नाही. तसेच हिंसाग्रस्त भागांमध्ये शोध मोहीम राबवून लुटलेली सगळी शस्त्रे परत मिळवली पाहिजेत. अराजकीय आणि बंडखोर यांना मारावेच लागेल. प्रसंगी कठीण निर्णय घेऊन हा हिंसाचार थांबवावा लागेल. सैन्याच्या हाताखाली सर्व सुरक्षादले द्यायला हवीत.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.