गुरुमहिमा !
१. श्री गुरुस्तुती !
१ अ. शास्त्रामध्ये श्री गुरूंच्या स्तुतीसाठी दिलेले मंत्र
१. ‘तीर्थस्वरूपाय नमः ।’ म्हणजे ‘तीर्थस्वरूप असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
२. ‘उदारहृदयाय नमः ।’ म्हणजे ‘ज्यांचे हृदय उदार आहे, अशा श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
३. ‘जितेन्द़्रियाय नमः ।’ म्हणजे ‘जे जितेंद्रिय आहेत, ज्यांच्या स्मरणाने आम्हीसुद्धा जितेंद्रिय होऊ शकतो’, अशा इंद्रियांना जिंकणार्या श्री गुरूंना नमस्कार आहे.’
४. ‘पावकाय नमः ।’ म्हणजे ‘अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
५. ‘पावनाय नमः ।’ म्हणजे ‘पवित्र असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
६. ‘भारतगौरवाय नमः ।’ म्हणजे ‘जे भारताचे गौरव आहेत, अशा श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
७. ‘ज्ञानमूर्तये नमः ।’ म्हणजे ‘ज्ञानमूर्ती असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
८. ‘ज्ञानयोगिने नमः ।’ म्हणजे ‘ज्ञानयोगी अशा श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
९. ‘महर्षये नमः ।’ म्हणजे ‘महर्षी असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
१०. ‘परमेश्वराय नमः ।’ म्हणजे ‘परमेश्वरस्वरूप असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
१ आ. शास्त्रामध्ये ज्ञान आणि भक्ती यांचे दाता असलेल्या श्री गुरूंची स्तुती दिलेले सुंदर मंत्र
१. ‘जनप्रियाय नमः ।’ म्हणजे ‘जे सर्वांचे प्रिय आहेत’, अशा श्री गुरूंना नमस्कार आहे.
२. मधुरस्वभावाय नमः ।’ म्हणजे ‘ज्यांचा स्वभाव मधुर आहे, अशा श्री गुरूंना नमस्कार आहे.’
३. ‘सुहृदे नमः ।’ म्हणजे ‘जे सर्वांचे सुहृद (मित्र) आहेत, जसा भगवंत सर्वांचा सुहृद असतो, तसेच सद़्गुरुसुद्धा सर्वांचे सुहृद, म्हणजे ‘सखा’ असतात.
४. ‘करुणासागराय नमः ।’ म्हणजे ‘जे करुणासागर आहेत’, अशा श्री गुरूंना आमचा नमस्कार आहे.’
५. ‘सत्यसङ्कल्पाय नमः ।’ म्हणजे ‘सत्यसंकल्परूपी श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
६. ‘साधवे नमः ।’ म्हणजे ‘जे खरे साधू आहेत, वास्तवात खरे संत आहेत, त्यांना आमचा प्रणाम आहे.’
७. ‘संन्यासिने नमः ।’ म्हणजे ‘संन्यासी वृत्ती धारण केलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
८. ‘श्रुतिपारगाय नमः ।’ म्हणजे ‘श्रुति म्हणजे वेद-उपनिषदे यांमध्ये जे (गुरु) पारंगत आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे.’
९. ‘श्रोत्रियाय नमः ।’ म्हणजे ‘जो सर्व शास्त्रांचे रहस्य जाणतो’, अशा श्री गुरूंना आम्ही प्रणाम करतो.’
१०. ‘कृतात्मने नमः ।’ म्हणजे ‘आत्मज्ञानी श्री गुरूंना नमस्कार आहे.’
११. ‘क्षमाशीलाय नमः ।’ म्हणजे ‘जे क्षमाशील आहेत, आमच्या दोषांना क्षमा करतात’, अशा गुरूंना आमचा नमस्कार आहे.
१२. ‘समबुद्धये नमः ।’ म्हणजे ‘गुरु समत्व बुद्धीचे असतात. ते कधीही पक्षपात करत नाहीत.’
१३. ‘स्वयंज्योतिषे नमः ।’ म्हणजे ‘काय केल्याने साधकाचे भविष्य सुखद होईल ?’, ते श्री गुरु सांगतात.
१४. ‘छिन्नसंशयाय नमः ।’ म्हणजे ‘आमचे विकल्प (संशय) दूर करणार्या श्री गुरूंना नमस्कार आहे.’
१५. ‘द्वंद्वातीताय नमः ।’ म्हणजे ‘जे द्वंद्वांच्या पलीकडे आहेत, अशा श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
१६. बन्धमोक्षकाय नमः ।’ म्हणजे ‘बंधनांतून मुक्ती देणार्या श्री गुरूंना नमस्कार आहे.’
१७. ‘उत्साहवर्धकाय नमः।’ म्हणजे ‘जे साधकांचा उत्साह वाढवतात’, अशा श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
१८. ‘दृढनिश्चयाय नमः ।’ म्हणजे ‘दृढनिश्चय करण्याची प्रेरणा देणार्या श्री गुरूंना नमस्कार आहे.’
१९. ‘मनोहराय नमः ।’ म्हणजे ‘आमचे मन हरण करणार्या श्री गुरूंना नमस्कार आहे. व्यक्तीच्या अंतर्मनातून संसाराचे आकर्षण नष्ट होते आणि श्री गुरु, ईश्वर अन् ईश्वराचे नाम यांच्याप्रती स्वाभाविकपणे आवड निर्माण होते.
२०. ‘सर्वहितचिन्तकाय नमः ।’ म्हणजे ‘सर्वांच्या हिताची काळजी घेणार्या आणि सर्वांचेच हित करणार्या श्री गुरूंना प्रणाम आहे.
२१. ‘तापनाशनाय नमः ।’ म्हणजे ‘आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांना दूर करणार्या श्री गुरूंना नमस्कार आहे.
२२. ‘धर्मसंस्थापकाय नमः ।’ म्हणजे ‘धर्माचे रहस्य सांगणार्या आणि जनमनाच्या हृदयात धर्माची स्थापना करणार्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
२३. ‘अद्वितीयाय नमः ।’ म्हणजे ‘जे अद्वितीय आहेत, म्हणजे ज्यांच्यापेक्षा कुणी दुसरे श्रेष्ठ नाही’, अशा गुरूंना आमचा नमस्कार आहे.’
२४. ‘सुमनसे नमः ।’ म्हणजे ‘फुलासारखे सुंदर मन असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
‘श्री गुरूंचे मन ‘सुमना’सारखे, म्हणजे उमललेल्या फुलासारखे असते. उमललेले फूल सर्वांना सुगंध देते, तसे श्री गुरु सर्वांना सुगंध आणि दिव्य जीवन जगण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे ‘सुमनसे नमः ।’, अशी गुरूंची स्तुती करणार्या मंत्रात म्हटले आहे. आपण त्यांच्या संपर्कात राहिल्यास आपलेे मनही सुमन, म्हणजेच फुलासारखे उमललेले (आनंदी) रहाते. मन कधी उदास, बेचैन, उद्विग्न किंवा त्रस्त रहात नाही.
२५. ‘प्रसन्नात्मने नमः ।’ म्हणजे ‘जे सदैव प्रसन्न रहातात आणि सर्वांना प्रसन्नता वाटतात’, अशा श्री गुरूंना नमस्कार आहे.
२६. ‘आनन्दाय नमः ।’ म्हणजे ‘आनंद आणि शांती यांचे दान करणार्या श्री गुरूंना नमस्कार आहे.’
२७. ‘सच्चिदानन्दाय नमः ।’ म्हणजे ‘सच्चिदानंदस्वरूप असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
२८. ‘धैर्यप्रदाय नमः ।’ म्हणजे ‘ज्यांच्या दर्शनाने आपोआप धैर्य आणि शांती लाभते’, अशा श्री गुरूंना माझा नमस्कार आहे. २९. ‘शान्तिप्रदाय नमः ।’ म्हणजे ‘गुरु सर्वांना मनाची शांती प्रदान करतात.’
३०. ‘स्थितप्रज्ञाय नमः ।’ म्हणजे ‘स्थितप्रज्ञ स्थितीमध्ये असणार्या श्री गुरूंना नमस्कार आहे.’
३१. ‘अविनाशिने नमः ।’ म्हणजे ‘अविनाशी असलेल्या श्री गुरूंना (गुरुतत्त्वाला) माझा नमस्कार आहे.’
३२. ‘नारायणाय नमः ।’ म्हणजे ‘गंगामाता ही काही सर्वसाधारण नदी नाही आणि हनुमान हा काही सर्वसाधारण वानर नाही, त्याचप्रमाणे गुरुसुद्धा कुणी सर्वसाधारण नर नसून ते साक्षात् नारायण आहेत’, अशा गुरूंना माझा नमस्कार आहे.
२. श्री गुरूंना शरणागतीने केलेली प्रार्थना !
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।
तस्मात् कारुण्यभावेन रक्ष मां परमेश्वर ॥
अर्थ : तुझ्याविना मला कुणीही आधार नाही. मी तुला शरण आलो आहे; म्हणून हे परमेश्वरा, करुणेचा वर्षाव करून तू माझे रक्षण कर.
३. सर्वश्रेष्ठ अशा श्री गुरूंना नमस्कार आहे !
अ. श्री गुरुभ्यो नमः ।
अर्थ : श्री गुरुदेवांना नमस्कार आहे.
आ. श्री परमगुरुभ्यो नमः ।
अर्थ : सर्वोच्च अशा श्री गुरूंना नमस्कार आहे.
इ. श्री परात्परगुरुभ्यो नमः ।
अर्थ : परात्पर (सर्वश्रेष्ठ) अशा श्री गुरूंना नमस्कार आहे.
ई. श्री परमेष्ठिगुरुभ्यो नमः ।
अर्थ : ब्रह्मा, विष्णु आदी देवतास्वरूप असणार्या श्री गुरुदेवांना नमस्कार आहे.
(विविध संकेतस्थळांवरून मिळालेले ज्ञान.)
– (सद़्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (१५.५.२०२३)