धर्मांतर करण्यासाठी आलेल्या महिलांची सखोल चौकशी करण्याची मागणी !
नगर (अहिल्यानगर) – पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ३ ख्रिस्ती महिला काष्टी येथे रहाणारे मयूर मदरे यांच्या घरी बळजोरीने घुसल्या. त्यांनी मयूर आणि त्याची आई यांना ‘तुम्ही ख्रिस्ती धर्मात प्रवेश करा म्हणजे तुमची सर्व संकटे आणि अडचणी दूर होतील, तसेच तुमच्या मुलाचे लग्नही होईल’, असे सांगून कपाळाला तेल लावले अन् येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणण्यास आरंभ केला. या प्रकरणाची माहिती सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते श्री. प्रतीक पाचपुते यांना समजल्यावर त्यांनी या प्रकरणाचा जाब विचारला, तसेच संबंधित प्रकरणाची काष्टी पोलीस ठाण्यात माहिती दिली. या महिलांच्या विरोधात तक्रारही प्रविष्ट केली; मात्र महिला समर्थकांच्या दबावामुळे, तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते पाचपुते यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा नोंद केला आहे. ‘या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि समाजासमोर खरा प्रकार उघडकीस यावा, या ख्रिस्ती महिलांवर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच त्यांच्यावर धर्मांतर कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद व्हावेत’, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भेटून महामाया बुद्ध धम्म संस्थेच्या अध्यक्षा, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्ह्याचे सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते यांनी केली. नगर विश्रामगृह येथे पत्रकार परिषदे घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहितीही देण्यात आली.
संपादकीय भूमिका :बळजोरीने धर्मांतर करणार्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी. असे केले, तरच वारंवार घडणारे धर्मांतराचे प्रकार थांबतील ! |