पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ !
नवी देहली – केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पोस्टाच्या विविध मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.१० ते ०.३० टक्के इतकी वाढ केली आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी व्याजदर निश्चित केले असून १ जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे.
(सौजन्य : Aaj Tak)
पोस्टाच्या एका वर्षांच्या मुदत ठेवीवर आता ६.९ टक्के व्याज मिळणार आहे. त्यावर आधी ६.८ टक्के व्याज मिळत होते. त्याचप्रमाणे २ वर्षांच्या मुदत ठेवीवर आता ६.९ टक्क्यांऐवजी ७ टक्के व्याज मिळणार आहे, तर ५ वर्ष मुदतीच्या आवर्ती (रिकरिंग) ठेवींवर ६.५ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे.
मुदत ठेव व्याजदरातील बदल –
पी.पी.एफ्., सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेत कोणताही पालट नाही !
तथापि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पी.पी.एफ्.), मुलींसाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली बचत योजना आणि किसान विकास पत्र या योजनांतील गुंतवणुकीवरील व्याजदरात कोणताही पालट केलेला नाही.
रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून कर्जाच्या व्याजदरात एकंदर अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बँकांकडून विविध ठेवींवर आकर्षक व्याजदर दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.