गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारसेवा करतांना दापोली येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती

१. सौ. प्रियांका शरद पवार

१ अ. गुरुपौर्णिमेच्‍या प्रसारासाठी सेवेला गेल्‍यावर दुखणारा पाय गुरुकृपेने बरा होणे आणि सेवेतून आनंद मिळणे

‘मला मणक्‍याचा त्रास असल्‍याने अधिक चालले की, पाठ दुखू लागते. मला सेवेसाठी बाहेर पडायचे होते. त्‍या दिवशी पाऊस भरपूर होता; पण मनातून ठरवले होते की, ‘सहसाधकांच्‍या समवेत सेवेला जायचे. सेवेला बाहेर पडल्‍यावर घरापासून ५ मिनिटांचे अंतर चालून गेल्‍यावर डावा पाय कमरेपासून दुखायला लागला. त्‍यामुळे माझ्‍या मनात ‘मला सेवा जमणार नाही. आता परत जाऊया’, असा विचार आला. नंतर मी गुरुमाऊलीला (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘मला सेवा करायची आहे. तूच माझा हात धर आणि मला घेऊन चल. मला पाऊल उचलणेसुद्धा अशक्‍य वाटत आहे.’ थोड्या वेळाने मी माझे दुखणे पूर्णपणे विसरूनच गेले. पाऊस भरपूर असतांनाही मी दोन घंटे सेवा केली. त्‍यामुळे मला आनंद मिळाला. हे गुरुमाऊलींच्‍या कृपेमुळेच शक्‍य झाले.’

२. श्री. परेश गुजराथी आणि सौ. सुहासिनी डोंगरकर

२ अ. सकारात्‍मक राहून सेवेसाठी बाहेर पडल्‍यावर पावसाचा त्रास न होणे

‘वर्ष २०२१ च्‍या गुरुपौर्णिमेचा प्रसार करतांना पावसामुळे पुष्‍कळ अडचणी येत होत्‍या. प्रसार करण्‍यासाठी बाहेर पडता येत नव्‍हते. एक दिवस देवाने मनामध्‍ये असा विचार घातला की, ‘पाऊस त्‍याची सेवा करत आहे. आपण आपली गुरुसेवा करूया.’ सकारात्‍मक राहून आम्‍ही सेवेसाठी बाहेर पडलो.

त्‍या दिवशी आम्‍ही देवाला प्रार्थना केली होती की, ‘देवा, तुझी कृपादृष्‍टी आमच्‍यावर राहू दे.’ बाहेर गेल्‍यावर आम्‍हाला थोडा वेळ पाऊस लागला. त्‍यानंतर सेवा पूर्ण होईपर्यंत पाऊस आला नाही. जेव्‍हा आम्‍ही सेवा आटोपून निघालो, तेव्‍हा पुन्‍हा पाऊस चालू झाला. दोन दिवसांनी पुन्‍हा आम्‍ही सेवेसाठी गेलो, त्‍या वेळीसुद्धा अशीच अनुभूती आली. जातांना अगदी बारीक पाऊस होता; पण नंतर पाऊस थांबला. संपूर्ण सेवा पूर्ण होईपर्यंत आम्‍हाला कुठे पावसाने त्रास दिला नाही.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ६.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक