वर्ष २०२२ च्या पालक्काड (केरळ) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी गुरुकृपेने झालेला प्रसार आणि आलेल्या अनुभूती
‘वर्ष २०२२ मध्ये केरळ राज्यातील पालक्काड जिल्ह्यात गुरुपौर्णिमा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा तेथे गुरुकृपेने साधकांना गुरुपौर्णिमेची सिद्धता करतांना आणि सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. साधकसंख्या अल्प असूनही गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी साधकांमध्ये उत्साह असणे
पालक्काड हे कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रापासून ३.३० घंटे अंतरावर (साधारण १४५ कि.मी.) आहे. या जिल्ह्यात केवळ १ साधिका आणि साधना सत्संगातील ८ – ९ जिज्ञासू आहेत. या जिज्ञासूंपैकी ६ – ७ महिला आहेत. पालक्काड येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे ठरवले. तेव्हा तेथील साधक आणि जिज्ञासू पुष्कळ उत्साही होते अन् सर्वजण सेवा करण्यासाठी उत्सुक होते. गुरुपौर्णिमेच्या प्रसारासाठी कोची सेवाकेंद्रातून शेवटचे ८ दिवस ३ – ४ साधक प्रसारासाठी गेले होते.
२. साधक आणि जिज्ञासू यांनी गुरुपौर्णिमेसाठी प्रसार करतांना पदोपदी अनुभवलेले भगवंताचे साहाय्य
२ अ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी सभागृह विनामूल्य मिळणे : पालक्काड येथील साधिका आणि जिज्ञासू रहात असलेल्या ठिकाणी एका नवीन सभागृहाचे बांधकाम चालू होते. सभागृहाच्या मालकांना ‘गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी सभागृह हवे आहे’, असे कळल्यावर त्यांनी ‘गुरुपूजन आणि कार्यक्रम याच सभागृहात होऊ देत’, असे सांगून ते विनामूल्य दिले. त्यांनी गुरुपौर्णिमेसाठी साहाय्य करण्याचेही आश्वासन दिले. गुरुकृपेने जिज्ञासू रहातात, त्याच भागात सभागृह उपलब्ध झाल्याने साधकांना प्रसार करणे सोपे झाले.
२ आ. प्रसाराचा अनुभव नसतांनाही जिज्ञासू आणि साधक यांनी गुरुपौर्णिमेच्या प्रसाराला प्रारंभ करणे : जून मासात साधकांसाठी साधना शिबिर झाल्यामुळे गुरुपौर्णिमेच्या प्रसाराला अल्प वेळ होता. आम्ही पालक्काड येथील जिज्ञासू आणि साधक यांचा ‘ऑनलाईन’ सत्संग घेऊन त्यांना ‘प्रसार कसा करायचा ?’ हे सांगून त्यांचा सराव करून घेतला. त्यानुसार त्यांनी गुरुपौर्णिमेच्या प्रसाराला प्रारंभ केला. त्यांनी घरोघरी आणि दुकानात जाऊन निमंत्रण देणे अन् अर्पण घेणे अशा सेवा केल्या. त्यांना कुणालाही प्रसाराचा अनुभव नव्हता, तरीही केवळ तेथील साधिका सौ. प्रेमा कुमारन् यांची तळमळ आणि जिज्ञासू यांच्या साहाय्याने प्रसार चालू झाला.
२ इ. साधकांनी गुरुपौर्णिमेचा तळमळीने प्रसार करणे आणि त्यांना हितचिंतकांनीही साहाय्य करणे : गुरुपौर्णिमेच्या ७ – ८ दिवस आधी कोची सेवाकेंद्रातील ३ साधक पालक्काडला प्रसारासाठी गेले. साधक आणि जिज्ञासू यांनी गुरुपौर्णिमेचे फलक लावले, तसेच हस्तपत्रके वाटली. त्या वेळी तेथे पाऊस पडत असतांनाही त्यांनी तळमळीने सेवा केली. सेवाकेंद्रातून प्रसारासाठी गेलेल्या साधकांना त्या परिसराची नीट ओळख नव्हती, तरी पदोपदी साधक देवाची कृपा अनुभवत होते. तेथील हितचिंतकांनीही पुष्कळ साहाय्य केले.
२ ई. प्रसाराच्या कालावधीत हितचिंतकाच्या घरी अंघोळीचे पाणी गरम करण्याची यंत्रणा बिघडलेली असतांनाही साधकांना अंघोळीसाठी आवश्यक तेवढे गरम पाणी मिळणे : पालक्काड जिल्ह्यात थोडी थंडी असते. गुरुपौर्णिमेच्या सेवेला आलेले काही साधक एका हितचिंतकांच्या घरी निवासासाठी होते. त्यांच्या घरी काही दिवसांपासून अंघोळीचे पाणी गरम करण्याची यंत्रणा चालत नव्हती, तरीही साधक जेव्हा अंघोळीला जात असत, तेव्हा त्यांना आवश्यक तेवढे गरम पाणी मिळत होते. याविषयी त्या हितचिंतक घरमालकांना सांगितल्यावर त्यांना त्याचे आश्चर्य वाटले; कारण त्यांना त्या काळात कधीही गरम पाणी मिळाले नव्हते. गुरुकृपेमुळे साधकांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळाले.
३. सौ. प्रेमा कुमारन् आणि त्यांचे यजमान श्री. कुमारन् यांनी गुरुपौर्णिमेसाठी सर्वोतोपरी साहाय्य करणे
पालक्काड येथील साधिका सौ. प्रेमा कुमारन् आणि त्यांचे यजमान श्री. कुमारन् यांनी त्यांच्या परीने गुरुपौर्णिमेसाठी पुष्कळ साहाय्य केले. त्यांचे घर हे छोटे सेवाकेंद्र झाले होते. ‘गुरुकार्य छान झाले पाहिजे आणि त्यात काहीही अल्प पडू नये’, असा त्या उभयतांचा भाव होता. त्यांनी साधकांना त्यांची चारचाकी गाडी वापरण्यासाठी दिली. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसतांनाही त्यांनी ‘ऑटोरिक्शा’चे भाडे, पेट्रोल आणि अन्य व्यय स्वतः केला. त्यांनी साधकांच्या भोजनाचीही व्यवस्था केली. ‘गुरुदेवांनी जे दिले आहे, ते त्यांनाच अर्पण करायचे आहे’, असा त्यांचा भाव होता. ते साधक आणि जिज्ञासू यांच्या समवेत प्रसाराला जात होते. सौ. प्रेमा कुमारन् यांचे स्थानिक लोकांशी चांगले संबंध असल्यामुळे गुरुपौर्णिमेसाठी लागणार्या बर्याच गोष्टींसाठी प्रायोजक मिळाले.
४. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनुभवलेले देवाचे साहाय्य
४ अ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधक आणि जिज्ञासू यांनी उत्साहाने सेवा करणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी ५ साधक तमिळनाडूहून सेवेसाठी आले. साधना सत्संगातील जिज्ञासूंनी सभागृहाची स्वच्छता, कार्यक्रमाची सिद्धता, वक्ता आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या सत्कारासाठी पुष्प गुच्छ बनवणे, तोरण बनवणे, अशा सर्व सेवा उत्साहाने केल्या.
४ आ. सभागृहाच्या मालकांनी साधकांच्या भोजनाची व्यवस्था करणे : गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यावर सभागृहातून निघेपर्यंत सभागृहाचे मालक साधकांच्या समवेत तिथेच होते. त्यांनी रात्री सेवेसाठी असलेल्या साधकांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती; पण जेवण कमी पडले. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी साधकांना काहीही कळू न देता त्यांच्या घरी जेवणाची सोय केली आणि उर्वरित साधकांना जेवायला घरी बोलवले. कार्यक्रमानंतर साधकांनी सभागृह स्वच्छ केले. सभागृहाच्या मालकांना साधकांनी केलेली सेवा आवडली आणि ते साधकांशी जोडले गेले.
४ इ. गुरुपौर्णिमेच्या वेळी पाऊस पडत असतांनाही सभागृह भरेल एवढी उपस्थिती असणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी कार्यक्रमाच्या वेळी पाऊस पडत होता. ‘एवढ्या पावसात कार्यक्रमासाठी लोक येतील का ?’, असा माझ्या मनात विचार येत होता; परंतु साधकांच्या मनात विश्वास होता, ‘गुरूंच्या कार्यक्रमाला लोक निश्चित येतील.’ प्रत्यक्षातही तसेच घडले. एवढा पाऊस असतांनाही सभागृह उपस्थितांनी भरले. ही एक मोठी अनुभूतीच होती.
५. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाबद्दल मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
अ. कार्यक्रमासाठी निमंत्रित वक्त्या सौ. गीता अच्युतन् यांनी साधकांची सेवा पाहून साधकांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला.’’
आ. नगरसेविका सौ. अरुणा मुरुकेशन् म्हणाल्या, ‘‘मी माझे भाग्य समजते की, या कार्यक्रमात मी सहभागी होऊ शकले.’’
पालक्काड जिल्ह्यात गुरुपौर्णिमा कार्यक्रम करता येणे आणि त्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद, ही सर्व आम्हाला मोठी अनुभूतीच होती. यातून आम्ही गुरूंची कृपा अनुभवली. आमची काहीही क्षमता नसतांना गुरुदेवांनी सर्वांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करून घेतली. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– कु. प्रणिता सुखठणकर, केरळ (२२.०३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |