हृद्रोगाची (हृदयाचे विकार) लक्षणे आणि त्याविषयीचे गैरसमज
घरोघरी आयुर्वेद
३० ते ३५ वयाच्या विशेषत: पुरुषांमध्ये छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे, धडधड जाणवणे, अनामिक भीती वाटणे इत्यादी लक्षणे आढळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. कित्येकांना तर त्यांना हृदयरोग झाला असल्याची शंका येऊ लागते. काही आवश्यक चाचण्या करून याविषयीचे चित्र स्पष्ट होऊ शकते; मात्र बहुतेक वेळा सार्या चाचण्या सर्वसामान्यच (नॉर्मल) येतात. अशा वेळी यामागे कोणती कारणे असू शकतात ?
खाण्याच्या चुकीच्या सवयीतून (भूक नसतांना जेवणे, अतीमसालेदार पदार्थ, रात्री उशिरा जेवणे) उत्पन्न झालेले अजीर्ण आणि त्यातून निर्माण होणारे अम्लपित्त किंवा ग्रहणी यांसारखे आजार असू शकतात. (काही वेळा अम्लपित्त हे लक्षण पुढे होऊ घातलेल्या हृद्रोगाचे (हृदयाचे विकार) पूर्वरूपही असू शकते, हे उपचार करणार्या वैद्यांनी लक्षात घेणे आवश्यक.)
‘पाण्डु’ नामक विकारातही अशी लक्षणे आढळतात. यालाही बहुतेक वेळा पचायला जड, थंड, शिळा आहार कारणीभूत असतो.
‘चिंता’ आधुनिक वैद्यक याला ‘Midlife Crisis’ असे म्हणते. पूर्वी ४० ते ६० वयोगटात दिसणारी ही लक्षणे आता कमी वयात दिसू लागली आहेत. वयाच्या या टप्प्यावर आपण करिअर, कुटुंब, आरोग्य याविषयी योग्य दिशेने प्रवास करत आहोत वा नाही ? या विचारांचा अतिरेक होऊन ‘रसवह स्रोतस’ (आहाराच्या पचनानंतर शरिराला धारण करणार्या ७ धातूंपैकी पहिल्या धातूचे म्हणजे रस धातूचे पोषण करणारा मार्ग) नामक शरिरातील प्रणाली दूषित होते. स्वाभाविकपणे त्याचे मूळ असलेल्या हृदयाची लक्षणे उत्पन्न होऊ लागतात. जेवणाच्या वेळा सांभाळणे, पुरेशी झोप, व्यायाम आणि प्राणायाम, ध्यान यांच्या साहाय्याने अन् काही काळापुरते आयुर्वेदाचे उपचार घेऊन या लक्षणांतून मुक्ती मिळवता येऊ शकते. सगळ्यात आधी तुम्हाला काहीही होत नाही, हे लक्षात घ्या. स्वतःच विचार करण्यापेक्षा किंवा ‘गूगल’वर शोध घेण्यापेक्षा वेळेत जवळचा वैद्य गाठा आणि मुख्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत आयुष्याचा आनंद लुटा !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली
(साभार : फेसबुक)