पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांचा डाव होता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
मुंबई – सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच केला होता. शरद पवार यांनी आमचा उपयोग करून घेतला. रणनीती आखली आणि एकप्रकारे आमची दिशाभूल करून निघून गेले. याला तुम्ही एकप्रकारचा ‘डबलगेम’ म्हणू शकता. पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांचा डाव होता, असा आरोप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘रिपब्लीकन टी.व्ही.’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी वरील आरोप केला.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आमच्याशी असलेले नाते तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत बोलणी चालू केली. त्या काळात ते आमचा फोनही उचलत नव्हते. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही चाचपणी चालू केली. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ‘आम्ही तुमच्यासमवेत येऊ शकतो’, असे सांगितले. त्यानंतर शरद पवार यांच्यासमवेत आमची बैठक झाली. बैठकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार स्थापन करण्याचे ठरले. ‘सरकार कसे स्थापन केले जाईल ?’ याविषयी आराखडा बैठकीत ठरवला गेला. अजित पवार आणि मला सर्वाधिकार दिले गेले अन् त्याप्रमाणे आम्ही सर्व सिद्धता केली. सर्व सिद्धता झाल्यानंतर शरद पवार यांनी ऐनवेळी त्यातून माघार घेतली. पहाटेचा आमचा शपथविधी होण्यापूर्वी ३-४ दिवस आधी हे घडले. त्यानंतर माझ्यासमवेत येण्याविना अजित पवार यांच्याकडे काही पर्याय नव्हता.’’ ते पुढे म्हणाले की, वर्ष २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत ४२ किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकणे आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करणे या माझ्या महत्त्वाकांक्षा आहेत. राष्ट्रीय राजकारणात जाण्याची तूर्तास तरी इच्छा नाही.
सत्तेसाठी भाजप कुठेही जाऊ शकतो, हे दाखवण्यासाठी या गोष्टी केल्या ! – शरद पवारमुंबई – मी दोन दिवसांनी धोरण पालटले होते, तर २ दिवसांनी शपथ घ्यायचे कारण काय होते ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते पुढे म्हणाले की, याचा अर्थ स्पष्ट आहे की, आम्ही सत्तेसाठी कुठेही जाऊ शकतो, ही भाजपची भावना होती. भाजपचा हा चेहरा समोर आणण्यासाठीच या गोष्टी केल्या होत्या, असा गौप्यस्फोट पवार यांनी या पार्श्वभूमीवर केला. |